मुंबई - छोट्या पडद्यावर बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिल्या पर्वाच्या अफाट लोकप्रियतेनंतर दुसऱ्या सिझनची चाहत्यांना उत्सुकता आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांविषयी जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक होते. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात घरात प्रवेश करताच चर्चेत आलेला स्पर्धक म्हणजे कवी मनाचा नेता अशी ओळख असलेला अभिजीत बिचुकले. घरात त्याने आपलं वर्चस्व निर्माण करण्याची सुरुवात केली आहे.
बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वीपासून अभिजित बिचुकले हे नाव गाजलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात तो राहतो. आजवर प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्याने बरेचसे स्टंट केले आहे. एवढंच काय, तर खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील त्यांच्या एका भाषणात म्हटले होते, की 'मी एकाच व्यक्तीला घाबरतो, तो म्हणजे अभिजित बिचकुले'.

अभिजितने आजवर बऱ्याच निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, दरवेळी त्याला अपयश आले आहे. महाराष्ट्राचा २०१९ चा मुख्यमंत्री मीच ठरवणार, या वक्तव्याने देखील तो चर्चेत आला होता. त्याचे बरेचसे बॅनरही लावण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना त्याने अनामत रक्कम भरताना चक्क १२ हजार ५०० रुपयांची चिल्लर जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली होती. त्याने अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यामुळेही तो प्रसिद्धी झोतात आला होता.
आता त्याने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. पहिल्याच भागात त्याने कविता सादर करुन आपल्या कवी मनाची ओळख करून दिली होती. त्याच्याबद्दल घरात तक्रारीदेखील पाहायला मिळत आहेत. आता स्पर्धकांसोबत तो कसा खेळ खेळतो आणि बिग बॉसच्या घरात कसे आपले वर्चस्व स्थापन करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.