मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल हा काही दिवसांपूर्वीच तिसऱ्यांदा बाप बनला आहे. त्याची गर्लफ्रेन्ड ग्रॅब्रियेला हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर दोघांनीही आपल्या बाळाचे स्वागत करुन सोशल मीडियावर फोटो शेअर केले. आता गॅब्रियेलाचे प्रेग्नंसीनंतरचे फोटो देखील समोर आले आहेत. या फोटोमधील तिचा लूक पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
गॅब्रियेलाचे प्रेग्नंसीदरम्यान चांगलेच वजन वाढले होते. मात्र, प्रेग्नंसीनंतर अवघ्या ११ दिवसातच तिने पुन्हा वजन घटवून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिचे हे फोटो पाहुन तिने अलिकडेच बाळाला जन्म दिलाय, असे कोणालाही वाटणार नाही.
गॅब्रियेलाने तिच्या फोटोंसोबत लिहिलेय की 'प्रेग्नंसीदरम्यान माझे तब्बल २१ किलो वजन वाढले होते. माझे शरीर या सर्व प्रक्रियेतून जात असताना मी माझे वर्कआऊटही सुरू ठेवले. आठवड्यातून ५ दिवस मी वर्कआऊट करत होते. यादरम्यान मला जे काही खावेसे वाटले ते मी खाल्ले'.
दुसरा फोटो शेअर करुन तिने लिहिलेय, 'इथवर पोहोचायला मला वेळ लागला. मात्र, आपले शरीर आपण जसा आकार देऊ तसे बनू शकते. मी एवढच सांगेन. प्रेग्नंसीदरम्यान नियमित व्यायाम करा, फिरा आणि पोषक आहार घ्या.'
अर्जुन आणि गॅब्रियेला मागच्या एका वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याने त्याची पहिली पत्नी मेहर जेसिया हिला घटस्फोट दिला आहे. अर्जुन आणि मेहरला २ मुली आहेत. त्यानंतर तो गॅब्रियेलासोबत रिलेशनशिपमध्ये राहू लागला.