मुंबई - गेल्या दोनेक वर्षांपासून आलेली मरगळ चित्रपटसृष्टीने झटकून टाकली आहे. सिनेदरबारी अनेक नवीन चित्रपट रुजू होताहेत. त्यातीलच एक म्हणजे बहुप्रतीक्षित ‘चंद्रमुखी’. तर ही चंद्रमुखी कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. चंद्रमुखीच्या चेहऱ्यावरून पडदा हटला असून चंद्रमुखीच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार आहे. चंद्रमुखी' चे मुखावलोकन झाले मुंबईच्या आयकॉनिक ऐतिहासिक थिएटरमध्ये. ऑपेरा हाऊस मध्ये मोठ्या जल्लोषात चंद्रमुखी च्या ३० फूटी फोटोचे अनावरण करण्यात आले.
ऑपेरा हाऊस ‘चंद्रमुखी’ सारखे व ‘चंद्रमुखी’ साठी नटले होते. प्रवेश करताच रोषणाईने झगमगलेले भव्य मैदान, सर्वत्र रंगीबेरंगी पताके, बाजूला तिकीटबारी, समोर सजलेला तमाशाचा फड, गजरा आणि अत्तराचा दरवळणारा सुवास, फेटा बांधलेला रसिक समुदाय, तोंडात विडा, ढोलकीचा ताल, घुंगरांची साथ, बहारदार लावणी, रसिकांच्या टाळ्या, शिट्ट्यांचा गजर यातून भूतकाळातील लावणी चा फडच जणू अनुभवायला मिळाला. ऑपेरा हाऊस मध्ये प्रामुख्याने इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांचे कार्यक्रम होतात तिथे प्रथमच ढोलकीची थाप पडली आणि घुंगरांचा नाद घुमला तसेच 'चंद्रा' हे शीर्षक गीतही सादर करण्यात आले. या गाण्याला श्रेया घोषाल हिने स्वरबध्द केले असून गाण्याचे बोल गुरू ठाकूर यांचे आहेत. तर या गाण्याला अजय-अतुल यांचे संगीत लाभले आहे. डोळे दिपवून टाकणाऱ्या या भव्य सोहळ्यात ३० फूटी 'चंद्रा'च्या फोटोचे अनावरण लाल दिव्याच्या गाडीमधून आलेल्या रूबाबदार अशा दौलत देशमाने म्हणजेच आदिनाथ कोठारे याने केले. या वेळी चंद्राने आपल्या बहारदार लावणीने उपस्थितांची मने जिंकली.
हेही वाचा - निळ्या पँट सूटमध्ये सोनम कपूरचा प्रेग्नन्सी ग्लो पाहा फोटो
चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाला, '''चंद्रमुखी'चा चेहरा प्रेक्षकांसमोर कधी येणार, याची आम्ही सुद्धा आतुरतेने वाट पाहात होतो. मात्र यासाठी आम्ही योग्य वेळेच्या शोधात होतो आणि अखेर ती योग्य वेळ आली आहे. चंद्रा ही अशी लावण्यवती आहे, जिच्या सौंदर्याने कोणीही घायाळ होईल. आपल्या सौंदर्याने, अदांनी समोरच्याला मोहात पाडणारी 'चंद्रा' लढवय्यी आहे. तिच्या या लढ्याला यश मिळते का, हे 'चंद्रमुखी' पाहिल्यावरच कळेल.'' संगीतकार अजय -अतुल म्हणाले, ''हा एक भव्य चित्रपट असल्याने त्याच्या गाण्यांची भव्यताही तितक्याच ताकदीची हवी होती. चंद्रासारख्या सौंदर्यवतीला साजेशी अशी गाणी या चित्रपटात आवश्यक असल्याने यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली. यात आम्हाला दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्यासह चित्रपटाच्या टीमची बरीच मदत झाली. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. त्यामुळे आमच्या या गाण्यांना अमृताने तिच्या नृत्याच्या अदाकारीने चारचाँद लावले आहेत.''
हेही वाचा - राधिका मदनने सुरू केले 'सना'चे शुटिंग