पुणे - डॉ. श्रीराम लागू यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दिग्गज कलावंतांची मांदियाळी बालगंधर्व परिसरात जमा झाली आहे. डॉक्टरांसोबत काम केलेले, त्यांना दिग्दर्शित करण्याची संधी मिळालेल्या अमोल पालेकर यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी बोलताना पालेकर म्हणाले, "मराठी रंगभूमीचा दुसरा सुवर्णकाळ ज्याला म्हणतो, त्या सुवर्णकाळातलं एक अग्रगण्य व्यक्तीमत्व डॉ. श्रीराम लागू. माझ्या कारकिर्दीच्या उमेदीच्या काळात मला काम करायला, शिकायला मिळालं. त्यांच्या सहवासात, दिग्दर्शनाखाली काम करायला मिळालं. त्यांना दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. अनेक अंगानी माझी जी वृध्दी झाली त्याच्यामध्ये डॉक्टरांचा खूप मोठा हात आहे. त्याबद्दल सदैव ऋणीच राहीन.
"डॉक्टरांची महती केवळ कलावंत म्हणून न राहता, एक सामाजिक भूमिका घेणारे, होणाऱ्या गलिच्छ टीकेला घाबरुन न जाता ठामपणे आपल्या भूमिकेवर ठाम राहणं हे धैर्य खूप कमी कलावंतांमध्ये दिसतं, डॉक्टर लागू हे त्यापैकी एक होते.
"सेन्सॉरशीप विरुध्दचा लढा असो, व्यवस्थेविरुध्द दिलेला लढा, किंवा अंधश्रध्देच्या बाबतीत खंबीरपणे उभं राहून दिलेला लढा आणि तळागाळात जाऊन त्यांच्याशी संवाद साधून दिलेला लढा यासगळ्यांमुळे मला वाटतं की इतकं उत्तुंग व्यक्तीमत्व पुन्हा आपल्याला दिसायला मिळं कठीण. विशेषतः आजच्या कठीण काळामध्ये डॉ. लागूंसारख्या व्यक्तीमत्वाकडून आजच्या तरुणाईने प्रेरणा घ्यावी. त्याच्यातून दिसणारा मार्ग घेऊन पुढची वाट चोखाळावी. याच पध्दतीने उभं राहणं ही त्यांना खऱ्या अर्थानं श्रध्दांजली ठरेल."