मुंबई - आपली पहिलीच मराठी पेशकश, 'पिकासो'ला, थेट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ मधील समस्त मंडळी एकदम खूष आहेत. नुकताच त्यांनी ‘पिकासो’चा जागतिक प्रीमिअर केला होता आणि सर्वच क्षेत्रांतून त्यावर खूप प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव झाला होता. आता तर त्यावर राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची मोहोर उमठली असल्यामुळे त्याला प्रेक्षक-प्रतिसाद दांडगा मिळेल असे म्हटलं जातंय. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचा पहिला मराठी डायरेक्ट-टू-सर्व्हिस चित्रपट 'पिकासो'चा ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘विशेष उल्लेखनीय’ (स्पेशल मेन्शन) श्रेणीत गौरव झाला असून लाखो अभिनंदनाचे संदेश येत आहेत.
'पिकासो' चे दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग 'पिकासो' चे दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी सांगितले की, "महत्वाकांक्षा आणि संपूर्ण आवेशाने जे सादर केले त्याचा विशेष उल्लेख देशातील सर्वात सन्माननीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये झाला आहे, हे ऐकून खरोखर आनंद होतो आहे. मला असे वाटते की, मी एकप्रकारे दशावतार या कलाप्रकाराला न्याय दिला आहे आणि प्रेक्षकांना ती गोष्ट दाखवली आहे जी सांगण्याची आवश्यकता होती. मी 'पिकासो' पाहिलेल्या आणि आवडलेल्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो. तसेच एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि २४० हून अधिक देशांमध्ये चित्रपट पोहोचवल्याबद्दल अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचे आभार मानतो."
‘पिकासो’ चित्रपटात प्रसाद ओक बाप आणि मुलाच्या हळूवार नात्याला तळकोकणातील दशावतार या पारंपारिक कलाप्रकाराच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आले आहे. या चित्रपटात एका मुलाचे छोटेसे स्वप्न साकार करण्याची धडपड दाखवली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच स्थानिक आणि जागतिक पातळीवर अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९ मध्ये 'पिकासो' ला अन्य २ सिनेमांसह चित्रपटांच्या विशेष उल्लेखनीय श्रेणीत गौरवण्यात आले आहे याविषयी निर्माते, शिलादित्य बोरा म्हणाले की, "हा एक अभिमानाचा क्षण आहे आणि 'पिकासो'ला इतके प्रेम, कौतुक आणि ओळख मिळत आहे, हे पाहून मला आनंद होतो आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील ‘विशेष उल्लेखनीय श्रेणीमध्ये गौरव होणे, हे आम्ही जे काम करत आहोत ते करतच राहण्यासाठीचे सर्वात मोठे प्रोत्साहन आहे. ज्यांनी 'पिकासो'ला इतके भरभरून प्रेम दिले, त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो."
‘पिकासो’ या दशावतार या लोककला प्रकारावर आधारित असलेल्या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, बाल कलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्लाटून वन फिल्म्स आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली शिलादित्य बोरा निर्मित, ‘पिकासो’ ची कथा अभिजीत मोहन वारंग यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे.
हेही वाचा - ६७वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : 'छिछोरे' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट; तर मराठीमध्ये 'बार्डो'ची बाजी