मुंबई - अभिनेता आलोक राजवाडेने प्रायोगिक रंगभूमीवर अभिनय, दिग्दर्शन अशा वैविध्यपूर्ण भूमिकांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. ‘नाटक कंपनी’ या संस्थेच्या माध्यमातून प्रायोगिक रंगभूमीवर सातत्याने तो वेगवेगळे प्रयोग करत असतो. याशिवाय ‘बोक्या सातबंडे’, ‘विहीर’, ‘रमा माधव’, ‘कासव’, ‘राजवाडे अँड सन्स’, ‘फॅमिली कट्टा’, ‘पिंपळ’ आदी मराठी चित्रपटातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत.
आलोक आता नवी इनिंग खेळण्यास सज्ज झाला असून तो लवकरच चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ असे आलोकच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे शीर्षक असेल.
या बद्दल बोलताना आलोक राजवाडे म्हणाला, ‘‘एका टीनएजर मुलाच्या वयात येण्याची गोष्ट या चित्रपटात आहे. सेक्शुअल फँटसी ते खऱ्या प्रेमाचा अर्थ म्हणजे नक्की काय? याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या तरुणाईची भाषा बोलणाऱ्या या चित्रपटाची मांडणी अतिशय हटके अंदाजात करण्यात आली आहे’’. ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ मध्ये युथफुल स्टारकास्ट असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.