मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा 'भूल भुलैय्या' हा चित्रपट २००७ साली सुपरहिट ठरला होता. हॉरर कॉमेडी असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईदेखील केली होती. अक्षय कुमारचा कॉमेडी अंदाजही प्रेक्षकांना भावला होता. आता तब्बल १२ वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वेल बनणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपट आणि संगीत निर्माते भूषण कुमार यांनी 'भूल भूलैय्या'चा सिक्वेल येणार असल्याची माहिती दिली आहे. मागील काही वर्षांपासून 'भूल भूलैय्या'च्या सिक्वेलसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. चित्रपट लेखक फरहाद सामजी यांच्याशी याबद्दल चर्चा सुरू आहे. या चित्रपटात नवे कलाकार झळकणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
सिक्वेलच्या कथेवर काम सुरू आहे. कथा पूर्ण झाल्यावर या चित्रपटात कोणते कलाकार भूमिका साकारणार ते ठरवण्यात येणार आहे. प्रॉडक्शन हाऊसकडून दोन आठवड्यांपूर्वी 'भूल भूलैय्या -२', असे शिर्षकही नोंदवण्यात आले आहे.
'भूल भूलैय्या' हा तमिळ चित्रपट 'चंद्रमुखी'चा रिमेक होता. या चित्रपटात विद्या बालन, शाइनी अहूजा, अमिषा पटेल, अक्षय कुमार, परेश रावल, हे कलाकार झळकले होते. अलिकडेच हॉरर कॉमेडी असलेल्या 'स्त्री' चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. हॉरर कॉमेडी असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता 'भूल भूलैय्या'च्या सिक्वेलचीही निर्मिती करण्यात येणार आहे.