मुंबई - अभिनेत्री-निर्माता प्रियंका चोप्रा जोनास रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये १० आणि ११ एप्रिल रोजी होणाऱ्या आगामी ब्रिटीश अकॅडमी फिल्म अवॉर्ड्समध्ये प्रेझेन्टर असणार आहे. प्रियंकाने आपल्या इन्स्टाग्रामस्टेरीवर बाफ्टाचे इन्स्टाग्राम पेज रिपोस्ट करीत ही बातमी दिली आहे.
"या रविवारी #EEBAFTA मध्ये उपस्थित राहण्याचा मला सन्मान मिळाल्यामुळे उत्साही आहे!" असे प्रियंका चोप्राने म्हटले आहे.
प्रियंका आणि इतर प्रेझेन्टर्स लंडनमध्ये असतील आणि लॉस एंजेलिसमधून रोझ बायर्न, अँड्रा डे, अण्णा केंड्रिक आणि रेनी झेलवेगर इत्यादी प्रेझेन्टर्स आभासी पध्दतीने सहभागी होतील.
या वर्षी इतर प्रेझेन्टर्समध्ये फोबी डायनेवर, चिवेटेल इजिओफर, सिन्थिया एरवो, हग ग्रँट, रिचर्ड ई. ग्रँट, टॉम हिडलस्टन, फेलीसिटी जोन्स, गुगु मब्था-रॉ, जेम्स मॅकएव्हॉय, डेव्हिड ओयलॉव आणि पेड्रो पास्कल यांचा समावेश आहे.
प्रियांकाचा शेवटचा ऑनस्क्रीन 'व्हाईट टायगर' हा चित्रपट होता. या चित्रपटाची ती कार्यकारी-निर्माती होती व चित्रपटात कामही केले होते. विशेष म्हणजे यावर्षी बाफ्टामध्ये 'व्हाइट टायगर' चित्रपटाला दोन नामांकने मिळाली आहेत. आघाडीच्या अभिनेत्याच्या व्यक्तीरेखेसाठी अभिनेता आदर्श गौरव आणि लेखक-दिग्दर्शक रामिन बहरामी यांना सर्वोत्कृष्ट रुपांतरित स्क्रीनप्लेच्या प्रकारात ही नामांकने मिळाली आहेत.
हेही वाचा - शूटिंग वेळी सर्व प्रकारची खबरदारी घेण्याची जबाबदारी निर्मात्यांची