मुंबई - बॉलिवूड हंक हृतिक रोशन तामिळ चित्रपट 'विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकमध्ये काम करु शकेल. या चित्रपटातील गँगस्टरच्या भूमिकेसाठी अगोदर आमिर खानची निवड झाली होती. मात्र त्याने काही क्रिएटिव्ह कारणासाठी हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या भूमिकेसाठी निर्माते हृतिक रोशनचा विचार करीत आहेत. या चित्रपटात सैफ अली खान देखील एक नीतिमान पोलिस अधिकारी म्हणून काम करणार आहे.
हृतिकच्या नावाचा विचार
मिस्टर परफेक्शनिस्टच्या बाहेर पडल्यानंतर निर्मात्यांना अशा अभिनेत्याची अपेक्षा होती जो मूळ अभिनेता विजय सेतुपति यांनी केलेल्या भूमिकेला न्याय देईल. त्यानंतर निर्मात्यांच्यासमोर हृतिकचे नाव आले. यावर ते गंभीरपणे विचार करीत आहेत. विक्रम वेधा या तामिळ चित्रपटात विजय सेतुपतीने गँगस्टरची भूमिका साकारली होती. हा चित्रपट दक्षिणेत प्रचंड गाजला होता.
आमिरने या कारणासाठी नाकारला होता विक्रम वेधा
'विक्रम वेधा' रिमेकची अंतिम पटकथा कशी तयार होते याची प्रतीक्षा आमिर करीत होता. मात्र हिंदीतील कथा त्याला पसंत पडली नाही. त्यानंतर या सिनेमातून आमिर स्वतःहून बाहेर पडला आहे. मुळ तामिळ चित्रपटाची पटकथा आमिरला खूप आवडली होती. परंतु हिंदी भाषेतील पटकथेमुळे तो प्रभावित झाला नव्हता. आमिरने माघार घेतली आहे, सैफ अजूनही या चित्रपटाचा एक भाग आहे पण आता चित्रीकरणाला उशीर होणार असल्याने निर्मात्यांना आमीरच्या जागी हृतिकचा विचार करावा लागत आहे.
मेकर्सने हृतिककडेही साधला होता संपर्क
विशेष म्हणजे आमिरने चित्रपटासाठी होकार देण्यापूर्वी एका क्षणी मेकर्सने हृतिककडेही संपर्क साधला होता. पण नंतर त्या गोष्टी काही केल्या गेल्या नाहीत. 'विक्रम वेधा' हृतिकबरोबर होणार असल्याचे दिसते आहे, कारण अनेक महिन्यांनंतर हा चित्रपट त्याच्याकडे परत आला आहे.
मूळ चित्रपटात आर. माधवन आणि विजय सेतुपती
मूळ चित्रपटात आर. माधवन याने कॉप विक्रमची भूमिका साकारली होती तर विजय सेतुपति याने वेधाची भूमिका केली होती. या रिमेकचे दिग्दर्शन पुष्कर-गायत्री करणार असून यांनीच मुळ चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते.
हेही वाचा - कार्तिक आर्यनने अवघ्या १० दिवसात पूर्ण केले 'धमाका'चे शुटिंग