मुंबई - सुप्रसिद्ध गायक अदनान सामी यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कलाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र, काही जणांनी त्यांच्या या पुरस्काराला विरोध केला आहे. काही वर्षांपूर्वीच भारताचे नागरिकत्व मिळालेल्या व्यक्तीला 'पद्मश्री' पुरस्कार का देण्यात येत आहे, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. तर, काहींनी अदनान यांच्या वडिलांचे उदाहरण देऊन त्यांच्या पुरस्काराचा विरोध करत त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. या सर्व ट्रोलर्सला अदनान यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
'माझ्या तत्त्वांत अशा प्रकारच्या गोष्टींना कोणतेही महत्त्व नाही. लोक काहीतरी म्हणत असतात आणि त्यांचं ते नेहमीचंच काम आहे. आपण सर्वांनाच आनंदी नाही ठेवू शकत. मात्र, मला मिळालेल्या सन्मानामुळे मी फार आनंदी आहे. ही गोष्ट माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी मी चाहत्यांचे आणि भारत सरकारचे आभार मानतो', असे अदनान यांनी म्हटले आहे.
अदनान यांचे वडील पाकिस्तानचे फायटर पायलट होते. त्यांच्यावरून अदनान यांना ट्रोल करण्यात येत आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, की माझे वडील १९६५ साली त्यांच्या मायदेशासाठी एका युद्धात उतरले होते. त्यासाठी त्यांना सन्मानही मिळाला होता. मात्र, त्यांच्या या गोष्टीचा माझ्याशी काहीही संबध नाही. जगात कुठेही आपल्या आईवडिलांच्या कामासाठी मुलांना शिक्षा देण्यात आली नाही. या मुद्द्यावरुन मला ट्रोल करण्यात काहीही तथ्य नाही. या मुद्द्यामुळे मला मिळणाऱ्या सन्मानाला तरी राजकीय गालबोट लावू नये. हा पुरस्कार या सर्व गोष्टींपेक्षा खूप उच्च स्तरावर आहे.
'हा पुरस्कार माझ्यात असणाऱ्या कलागुणांसाठी दिला जात आहे. जर, माझ्या कलागुणांमध्ये काही दोष असेल, तर त्यावर तुम्ही आक्षेप घ्या, असेही अदनान सामी यांनी म्हटले'.