गेल्यावर्षीपासून उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे जागतिक आर्थिक घडी विस्कटली आहे. देशातही लॉकडाऊन मुळे देशाच्या अर्थचक्राला खीळ बसली. व्यापारी आणि नोकरदार वर्गही या अशाश्वत अर्थकारणामुळे भयभीत झाला आहे. गरीब, सामान्यजनांचे तर फारच हाल झाले आणि होताहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक संसार उध्वस्त झाले. हातावर पोट असणाऱ्या कामगारवर्गाला उपासमारीला तोंड द्यावे लागतेय. परंतु आपल्या समाजात इतरांना मदत करणारेही खूप आहेत. सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नरोन्हा यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरीब स्पॉट बॉईजचे काम करणाऱ्यांना अभिनेता स्वप्नील जोशीच्या हस्ते १०० रेशन किट्सचे वाटप केले.
भारतात कोरोना व्हायरसचे प्रमाण वाढले असल्यामुळे बऱ्याच सिनेमांचे-मालिकांचे चित्रीकरण थांबले. त्यामुळे या क्षेत्रात स्पॉटबॉय म्हणून कार्यरत असणाऱ्या लोकांना अभिनेता स्वप्नील जोशी व सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नरोन्हा या दोघांनी मिळून मदतीचा हात दिला आहे. स्वप्नील व मॉरिस यांनी 'मीडिया बझ' या मीडिया कंपनीच्या साहाय्याने सिनेक्षेत्रात स्पॉटबॉयचे काम करणाऱ्या लोकांना शंभरहून अधिक रेशन किटचे वाटप केले आहे.
स्वप्नील व मॉरिस यांनी एक योजना आखून बोरिवली आणि दहिसर विभागातील झोपडपट्ट्यांमध्येही गरजूंना रेशन किटचे वाटप केले. कोरोना काळात गरजू व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन स्वप्नीलने आपल्या चाहत्यांना केले आहे. याआधीही मॉरिस नरोन्हा यांनी कोरोना काळात उत्तर मुंबईतील झोपडपट्टी भागातील गरजू लोकांना गॅस सिलिंडर, रेशन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलेले आहे.
स्वप्नील जोशीचे कौतुक तर झालेच परंतु मॉरिस नरोन्हा यांनी गेल्यावर्षीपासून सुरु झालेल्या कोरोना काळातील आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होते आहे.
हेही वाचा - वसुंधराप्रेमी सोनाक्षी सिन्हाला सोनी बीबीसी अर्थकडून मिळाला ‘अर्थ चॅम्पियन' सन्मान!