मुंबई - अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, 'चलचित्र कंपनी' निर्मित 'सनी' या सिनेमाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ललित प्रभाकर यात ‘सनी’ची भूमिका साकारत असून हेमंत ढोमे याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे, तर अक्षय विलास बर्दापूरकर आणि हेमंत ढोमे हे या सिनेमाचे निर्माते आहेत. या सिनेमाच्या पोस्टरवर निळ्याशार आभाळाखाली 'सनी' खळखळून हसताना दिसतोय. लाल, पिवळा, निळा असे गडद रंग आणि ललितचे खळखळून हसणे. अशा उत्साहाने भरलेल्या या पोस्टरवरूनच कळतेय की, हा सिनेमा काहीतरी सकारात्मक दृष्टिकोन देणारा आहे.
'सनी'बद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, "यातील ‘सनी’चे आयुष्य काही प्रमाणात मी स्वतःही जगलो आहे, म्हणूनच हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा माझ्या खूप जवळची आहे. ललित प्रभाकर या भूमिकेला तो योग्य न्याय देऊन त्यात रंग भरेल याची खात्री आहे आणि अक्षय बर्दापूरकर यांच्यासोबत प्रथमच काम करत असल्याने मी खूप उत्सुकही आहे आणि त्याचा आनंदही आहे.''
!['सनी' या सिनेमाचे टिझर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-hemant-dhome-lalit-prabhakar-sunny-planet-marathi-mhc10001_11092021075130_1109f_1631326890_142.jpeg)