प्रेम हा विषय चित्रपटांतून अनादी काळापासून दर्शविला गेला असला तरी त्याची गोडी अजूनही कमी झालेली नाही. आजही प्रत्येक चित्रपटात प्रेमाला प्राधान्य दिल जातं. प्रत्येक चित्रपटातून व्यक्त होणार प्रेम निराळ्या पद्धतीचं असतं. साईश्री एंटरटेनमेंटचा आगामी मराठी चित्रपटाच्या नावातसुद्धा प्रेम आहे. 'आय प्रेम यू‘ हे चित्रपटाचे नाव असून नावावरूनच चित्रपटाच्या कथेचे स्वरूप लक्षात येते. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून या चित्रपटात नेमकं वेगळेपण काय आहे याची उत्सुकता वाढली आहे. यात अभिनेता अभिजीत आमकर मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत कयादू लोहार ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत असेल. अभिजीत आणि कयादूची लव्हेबल केमिस्ट्री या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'आय प्रेम यू' चित्रपटाची कहाणी ही फक्त प्रेमकहाणी नसून मैत्री आणि त्यातून अलगद तयार झालेल्या नात्यांची कहाणी आहे. या चित्रपटात अभिजीत सखा या पात्राची भूमिका साकारत असून संगीताची आवड असलेला सखा प्रेमात कसे संगीताचे सूर भरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. तर कयादू या चित्रपटात वीणा हे पात्र साकारत असून स्वप्न उराशी बाळगून आलेल्या संकटाना सामोरी जाण्याची जिद्द असणारी अशी ही वीणा आपल्या प्रेमाला कशी सामोरी जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अभिजीत आमकर आणि कयादू लोहार यांची जोडी 'आय प्रेम यू' या चित्रपटातून प्रेमाचे रंग भरताना दिसणार आहे.
कोण आहे कायदू लोहार?
भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या कायदू लोहार हिने तमिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपट उद्योगात काम केले आहे. पुण्यात जन्मलेली आणि वाढलेली ही अभिनेत्री आता मराठी चित्रपट झळकणार आहे. यापूर्वी भारत एस नवुंदा दिग्दर्शित कन्नड चित्रपट मुगिलपेटे (2021) मधून तिने अभिनयात पदार्पण केले होते. तिने विनयन दिग्दर्शित पाथोम्बथम नूटंडू (2021) मधून मल्याळम चित्रपटात आणि सिम्बू सोबत गौतम वासुदेव मेनन दिग्दर्शित वेंदु थानिथाथु काडू (2022) या तमिळ चित्रपटात पदार्पण केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अभिजीत आमकर नव्या चित्रपटासाठी सज्ज
'टकाटक', 'एक सांगायचय' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेता अभिजीत आमकरने कायमच प्रेक्षकांच्या मनात घर केले. वेगवेगळ्या फोटोशूटमुळे आणि म्युझिक अल्बममधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येत राहिला. रोमँटिक कलाकारांच्या यादीत अभिजीत कुठेही कमी नाही आणि तो हे या चित्रपटातून सिद्ध करण्यास तयार झालाय. अभिजीत आणि कयादूची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार असून त्यांच्या अभिनयाच्या आणि कथेच्या जोरावर ही जोडी प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पाडेल यात शंकाच नाही.
दिग्दर्शक नितीन कहार दिग्दर्शित हा चित्रपट निर्माते मधुकर गुरसळ यांच्या 'साईश्री एंटरटेनमेंट' यांनी निर्मित केला आहे. या प्रेमाच्या लव्हेबल केमिस्ट्रीचे छायाचित्रण अविनाश सातोस्कर यांनी चित्रित केले आहे. 'आय प्रेम यू' चित्रपटाच्या मोशन पोस्टरने प्रेमीयुगुलांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.
‘आय प्रेम यू' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना भेटायला येत आहे.
हेही वाचा - ''मी भारताचा मोठा चाहता असून ताजमहाल पाहायची इच्छा आहे'' टॉम हॉलंड