मुंबई - बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानचा आज ५४ वा वाढदिवस. बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याच्या खऱया नावाबद्दल मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे. त्याचे पूर्ण नाव 'मोहम्मद आमिर हुसैन खान' असे आहे. मात्र, सध्या आमिर खान याच नावाने त्याची चित्रपटसृष्टीत ओळख आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया आमिरचे असे काही चित्रपट ज्यांना प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतले.
१. कयामत से कयामत तक - आमिरने या चित्रपटाआधी अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या. मात्र, हा खऱ्या अर्थाने त्याचा बॉलिवूड डेब्यू ठरला. त्याच्या या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. याच चित्रपटातून जूही चावलानेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटातील दोघांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. या चित्रपटासाठी आमिरला बेस्ट मेल डेब्यूचा अॅवॉर्डही मिळाला होता.
२. ३ ईडियट्स - आमिर खान, आर माधवन, शर्मन जोशी आणि करिना कपूरसारख्या कलाकारांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. बॉलिवूडच्या नेहमीच्या लव्हस्टोरीपेक्षा अगदीच वेगळी असलेली या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. दोस्त फेल हो जाए तो दुख होता है, लेकीन दोस्त फर्स्ट आ जाए तो ज्यादा दुख होता हैं! सारखे चित्रपटातील डायलॉग प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आणि तितकेच भावनिक करणारे होते. २०० कोटींचा गल्ला जमवणारा हा आमिरचा पहिला चित्रपट होता.
३. पीके - अनुष्का शर्मा, आमिर खान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले होते. हा चित्रपटदेखील नेहमीच्या लव्हस्टोरीज पलीकडे जाऊन एक वेगळा आशय प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यास आणि त्यांची मने जिंकण्यास यशस्वी ठरला. या चित्रपटाने जगभरात ६०० कोटीहून अधिक कमाई केली.
४. गजनी - ‘गजनी’ हा १०० कोटींच्या क्लबमध्ये जाणारा आमिरचा पहिला चित्रपट होता. यात आमिरसोबत असिनची मुख्य भूमिका होती. या चित्रपटातून असिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.