मुंबई - 'आई म्हणजे काय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते, आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही. कवी फ. मु. शिंदे यांनी केलेलं आईच हे वर्णन. मात्र, आईला आपण कायम गृहीत धरत असतो. त्यामुळेच आईची गोष्ट मांडणारी एक मालिका लवकरच स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू होत आहे. 'आई कुठे काय करते', असे या मालिकेच नाव आहे.
या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर, अभिनेता मिलिंद गवळी आणि अभिनेत्री दीपाली पानसरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. एका घरात सगळ्यांसाठी लागेल ते सर्व काही करणाऱ्या एका प्रेमळ आईची ही गोष्ट आहे. सगळेच कालांतराने तिला गृहीत धरत जातात. तिची मुलं, नवरा, नातेवाईक आप्तेष्ट सगळेच वेळोवेळी तिला याची जाणीव देखील करून देतात. मात्र, अशातच एके दिवशी तिला तीच आत्मभान परत मिळवायला हवं असं वाटत.
हेही वाचा -‘तुझ्यात जीव रंगला’मधला 'सन्नी दा' अडकला लग्नाच्या बेडीत
यानंतर नक्की काय होते, ते या मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल. या मालिकेद्वारे आपल्यातील प्रत्येकाला आपल्याच आईला पडद्यावर पाहिल्याच समाधान नक्की मिळेल, असे मधुराणी आणि मिलिंद यांनी सांगितलं.
या मालिकेचा लॉन्च सोहळा देखील अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आला. यावेळी पत्रकारांना आपल्या आईला सोबत घेऊन या पत्रकार परिषदेला यायला सांगितले होते. तसेच त्यांच्या आपल्या आईबद्दलच्या भावना एका व्हिडीओद्वारे व्यक्त करायला संगितले होते. त्यानंतर प्रत्येक पत्रकाराच्या हस्ते त्यांच्या आईचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या कष्टातून उतराई होण्याची संधी काही पत्रकारांना देण्यात आली.
हेही वाचा -‘आटपाडी नाईट्स’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित
'आई कुठे काय करते' ही मालिका येत्या २३ डिसेंबर पासून दररोज संध्याकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येणार आहे.