मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार सलमान दुलकर लवकरच 'जोया फॅक्टर' या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सोनम कपूर झळकणार आहे. येत्या १४ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, आता चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे.
आता हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता, मात्र तो जूनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता वर्ल्ड कपच्या कारणास्तव ही रिलीज डेटदेखील बदलण्याचा निर्णय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी घेतला आहे.
हा चित्रपट अनुजा चौहान यांच्या 'जोया फॅक्टर' या पुस्तकावर आधारित असणार आहे. चित्रपटात सलमान भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराची भूमिका साकारणार आहे. तर सोनम जाहिरात एजन्सीमध्ये काम करणाऱ्या तरूणीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट क्रिकेटवरच संबंधीत असल्याने सुरूवातीला तो वर्ल्ड कपच्या काळात प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. मात्र, याचा फटका चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला बसू शकतो, त्यामुळे निर्मात्यांनी ही तारीख बदलली आहे.