मुंबई - अभिनेता संजय दत्तला फुफ्फसाचा कर्करोग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्याची प्रकृती खालावली असून नुकताच त्याचा एक फोटा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी संजय दत्तच्या प्रकृतीवरून चिंता व्यक्त केली आहे.
संजय दत्तचे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 'मुन्ना भाई एमबीबीएस स्टार लवकर बरा हो', अशा भावना एका सोशल मीडियावरील चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
संजय दत्तचे अनेक चाहते त्याला 'बाबा' या नावानेही संबोधतात. 'बाबा' तू खूप अशक्त झाल्यासारखा वाटतोय. लवकर बरा हो, अशी आशा करतो, असे एका चाहत्याने लिहिले आहे. तर संजय दत्तला लवकरच बरे वाटेल, असे एका चाहत्याने ट्विट केले आहे.
सध्या अभिनेता संजय दत्तवर मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑगस्ट महिन्यात त्याला फुफ्फुसाचा कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती अधिकृतरित्या सांगितली नव्हती. संजय दत्त बहिण प्रिया दत्तबरोबर अनेक वेळा मुंबईतील रुग्णालयात दिसला होता.
संजयने काही दिवसांपूर्वी आपण कामातून ब्रेक घेणार असल्याचे सोशल मीडियाद्वारे जाहीर केले होते. मात्र, त्याच्या आगामी 'सडक टू'च डबिंगचं काही काम शिल्लक असल्याने ते पूर्ण करून मगच तो ब्रेक घेणार असल्याची इंडस्ट्रीत चर्चा होती. पत्नी मान्यता अथवा बहिण प्रिया यापैकी कुणीही संजयला नक्की काय झालं, यास दुजोरा दिलेला नाही. मात्र, मान्यताने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात संजू एक 'फायटर' असून तो या परिस्थितीतून नक्की सुखरूपणे बाहेर पडेल, अशी आशा व्यक्त केली होती.