मुंबई - अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा विद्युत जामवाल काही महिन्यांपूर्वीच 'जंगली' चित्रपटात झळकला होता. त्याच्या 'कमांडो' चित्रपटानंतर विद्युतला 'कमांडो फेम'अशी ओळख मिळाली आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत २ भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले. आता या चित्रपटाचा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून विद्युतनं नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. 'कमांडो ३' या चित्रपटात विद्युतसोबत अदा शर्मा ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर अंगीरा धर आणि गुलशन दैवेय्या हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.

विपुल अमृतल शाह यांची निर्मिती आणि रिलाएन्स एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले आहे. येत्या ६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला असून विद्युतचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
