मुंबई - दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 98 वर्षाचे होते. सकाळी 7.30 च्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिलीप कुमार यांचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. मात्र, आज त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. दिलीपकुमार यांच्या निधनानंतर राजकारण, चित्रपट सृष्टी, सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी कोरोनाच्या संक्रमणाने निधन झाले. भारतावर असलेल्या कोरोनाचे संकट पाहता, सायरा बानो यांनी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील साजरा केला नव्हता.
दिलीप कुमार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली होती. श्वास घेताना दम लागण्याच्या तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात (आयसीयू) त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्याचे खंडन सायरा बानो यांनी केले होते.
दिलीप कुमार यांचं खरं नाव मुहम्मद यूसुफ खान आहे. त्यांनी 1944 मध्ये आलेला चित्रपट 'ज्वार भट्टा'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी आपलं नाव बदललं. ते एक एक प्रख्यात अभिनेते होते. अभिनयात ते इतके निपुण होते की सत्यजित रे यांनी त्यांना ‘द अल्टिमेटिथ मेथड अॅक्टर’ (The Ultimate Method Actor) ही उपाधी दिली होती. त्यांची तुलना हॉलिवूड कलाकारांशी केली जात असे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून सिनेप्रेमींच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित होते दिलीप कुमार
- दिलीप कुमार अनेकदा फिल्म फेअर अवॉर्डने सन्मानित झाले आहेत.
- पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.
- पाकिस्तानचा 'निशान-ए-इम्तियाज' हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना देण्यात आला होता.
- १९९४ साली दादासाहेब फाळके पुरस्कारही देण्यात आला होता.
The Substance and Shadow हे उदयतारा नायर यांनी शब्दबद्ध केलेले लिहिलेले दिलीपकुमार यांचे इंग्रजी आत्मचरित्र आहे. दिलीप कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात. ज्वारभाटा (1944) हा त्यांचा पहिला आणि किला (1998) हा शेवटचा चित्रपट होता.
हेही वाचा - Dilip Kumar Died : 'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार यांचे फेमस डॉयलॉग...
हेही वाचा - LIVE : सुप्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांना सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली