कोरोना उद्रेकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत यशस्वीरीत्या लस निर्मिती करण्यात आली असून भारतात लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच निवासी संस्थांना त्यांच्या रहिवाशांसाठी मोहीम लसीकरण राबविण्यास परवानगी दिली आहे. चित्रपट उद्योगातसुद्धा बर्याच व्यवसाय संस्थांनी त्यांच्या युनिटच्या लसीकरणासाठी पावले उचलली आहेत जेणेकरून ते त्यांचे अभियान पुन्हा सुरू करू शकतील. आता राज्य शासनाने शुटिंग्सना परवानगी दिली आहे परंतु त्यांच्या अधिनियमाचे पालन करणे जरुरी आहे. त्यातच कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून लस घेणे अत्यंत महत्वाचे झाले आहे.
लसीकरणासाठी झालेल्या झुंबडीबाबत अनेकजण नाराज आहेत आणि अनेकांचे लसीकरण बाकी आहे. याच पार्श्वभूमीवर आपली सामाजिक बांधिलकी जपत आणि आपल्या कर्मचाऱ्यांप्रती संवेदनशील असलेला निर्माता साजिद नाडियाडवाला त्याच्या आगामी चित्रपटातील सर्व कर्मचार्यांचे लवकरच लसीकरण करून घेणार आहे. महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन बंदी उठविल्यानंतर नाडियाडवाला प्रॉडक्शनच्या चित्रपटांचे काम जोरात सुरु होणार आहे. कामावेळी कुठलीही बाधा येऊ नये आणि सर्वांना ‘सेफ’ वाटावे याकरता नाडियादवाला यांनी हा निर्णय घेतला असून ‘बच्चन पांडे’, ‘हीरोपंती २’, ‘कभी ईद कभी दिवाली’ आणि ‘तडप’ संबंधित सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे.
अक्षय कुमार आणि क्रिती सॅनॉन यांचा ‘बच्चन पांडे’, सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा ‘कभी ईद कभी दिवाली’, टायगर श्रॉफ चा ‘हीरोपंती २’, तारा सुतारियासह अहान पांडेचा पदर्पणीय चित्रपट 'तड़प' या चित्रपटांच्या संपूर्ण युनिट्सचे लसीकरण साजिद नाडियाडवाला यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. लसीकरण योजनेबाबत एका जवळच्या स्त्रोताने एका अग्रगण्य पोर्टलला सांगितले की, “साजिद नाडियादवाला त्याच्या निर्मितीसंस्थेतील युनिट्स सोबतच ऑफिसमधील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या सर्वांचे लसीकरण करून घेण्यात येणार आहे. सुमारे ५०० जणांच्या लसीकरणाची तयारी सुरु असून सोमवारपासून ही लसीकरण मोहीम सुरू होईल.”
साजिद यांच्या नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेन्मेन्ट या निर्मितीसंस्थेचा ‘तडप’ पोस्ट प्रॉडक्शन स्टेजला आहे, ‘बच्चन पांडे’ चे शेवटचे शेड्युल मुंबईत सुरु झाले आहे. युनिटच्या लसीकरणानंतर ‘हिरोपंती २’ च्या चित्रीकरणास सुरुवात होणार असून ‘कभी ईद कभी दीवाली’ चे काम प्री-प्रॉडक्शन स्टेजला असले तरी त्या युनिटचेसुद्धा लसीकरण करण्यात येणार आहे.
साजिद नाडियादवाला यांना आपल्या प्रॉडक्शन्सच्या सर्व प्रोजेक्ट्सच्या सर्व स्तरावर सुरक्षित वातावरणाची अपेक्षा आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्या चित्रपटाशी संबंधित सर्वांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे.
हेही वाचा - प्रेम प्रकरण चव्हाट्यावर आणल्यामुळे हर्षवर्धनवर कॅटरिना कैफ नाराज