मुंबई - लॉकडाऊन उठल्यावर ॲक्शन-स्टार टायगर श्रॉफने आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी त्याची भूमिका असलेला ॲक्शनने भरपूर ‘बागी ३’ प्रदर्शित झाला होता व चांगला बिझनेसही करत होता. परंतु कोरोना व त्यामुळे कपाळी आलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे बंद झालेली चित्रपटगृहे यामुळे तुफान चालणारा चित्रपट अपेक्षित कमाई करू शकला नाही. आता टायगर आणि त्याचा लाडका दिग्दर्शक ‘बागी ४’साठी सुद्धा एकत्र येणार आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या ‘हिरोपंती’ चा सिक्वेल येतोय त्याचेही दिग्दर्शन अहमद खानच करणार आहे.
साजिद नाडियादवाला निर्मित ‘हिरोपंती २’ च्या चित्रीकरणाची जुळवाजुळव सुरु झाली असून तो २ एप्रिलला सेटवर जाणार आहे. याच्या चित्रीकरणाची सुरुवात मुंबईत होणार असून हा चित्रपटसुद्धा ॲक्शनने भरपूर असणार आहे, ज्याचे ॲक्शन-डिझाईनिंग अहमद खान करीत असल्याचे सूत्रांकडून समजतंय. बागी २ आणि बागी ३ नंतर हिरोपंती २ हा टायगर श्रॉफ आणि अहमद खानचा एकत्र तिसरा चित्रपट आहे. साजिद नाडियाडवाला यांच्या या पुढच्या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सध्या जोरात सुरू आहे.
कोव्हीड-१९ ची परिस्थिती कशी आहे हे पडताळून पुढच्या शूटचे लोकेशन ठरविण्यात येईल. मुंबईत टायगरचे ॲक्शन सीन्स शूट करण्यात येणार असून त्याची जोरदार तयारीदेखील सुरु आहे. त्यानंतर टायगरची ‘स्टुडन्ट ऑफ द ईयर २’ ची को-स्टार तारा सुतारीया आठवड्याभरानंतर युनिटला जॉईन होईल. अलीकडेच, साजिद नाडियाडवाला यांनी अकादमी पुरस्कारप्राप्त संगीतकार ए.आर. रहमान यांना ‘हिरोपंती २’ च्या संगीत नियोजनाची जबाबदारी सोपवलीय. तसेच प्रख्यात गीतकार मेहबूब यांनाही चित्रपटासाठी साइन केलंय. ते एकंदरीत ५ गाणी बनविणार आहेत. योगायोग म्हणजे अहमद खान, मेहबूब आणि ए.आर. रहमान ‘रंगीला’ मध्ये एकत्र आले होते आणि आता तब्बल २५ वर्षांनंतर हे ‘त्रिकुट’ पुन्हा ‘हिरोपंती २’ साठी एकत्र येतंय. ‘माझे पहिले प्रेम म्हणजे ॲक्शन-थ्रिलर चित्रपट. तो पुन्हा करायला मिळतोय याचा आनंद आहे. आपण सर्वांनी हा आनंद ३ डिसेम्बर २०२१ ला एकत्र अनुभवुया’ असे टायगर म्हणाला.
‘हिरोपंती २’ ची घोषणा गेल्या फेब्रुवारीमध्ये करण्यात आली होती आणि यावर्षी टायगर श्रॉफच्या वाढदिवशी, २ मार्चला, त्याची प्रदर्शन तारीख, ३ डिसेंबर २०२१, घोषित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिग्दर्शक अहमद खान येत्या २ एप्रिलला चित्रीकरणाचा शुभारंभ करीत आहेत.
हेही वाचा - ‘कोण होणार करोडपती' ला मिस्ड कॉल म्हणजे एक करोडचा कॉल!