मुंबई - सुरुवातीला सोशल मीडिया हे केवळ लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन होते. मात्र, आता हेच साधन पैसे कमवण्याचा एक उत्तम मार्ग बनलं आहे. टीव्ही आणि वृत्तपत्रापाठोपाठ सोशल मीडियावर एखाद्या ब्रॅन्डची जाहिरात करण्याचं प्रमाण वाढलं असून याच कारणाने विराट कोहली आणि प्रियांका चोप्रा यांच्या नावांचा २०१९ इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये समावेश झाला आहे.
हूपर एचक्यू या ब्रिटनच्या सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनीने सादर केलेल्या इन्स्टाग्राम रिच लिस्टमध्ये प्रियांका चोप्रा १९ व्या तर विराट कोहली २३ व्या स्थानी आहे. तर या यादीत अव्वल स्थानी मॉडेल आणि बिजनेस वूमन काइली जेनर ही आहे. आपल्या एका इन्सटाग्राम पोस्टसाठी ती तब्बल ८.७४ कोटी रुपये घेते.
हूपर एचक्यूच्या अहवालानुसार एका प्रायोजिक पोस्टसाठी प्रियांका चोप्रा तब्बल १.८७ कोटी रुपये घेते. इन्स्टाग्रामवर प्रियांकाचे ४ कोटी ३० लाख फॉलोअर्स आहेत. तर क्रिकेटर विराट कोहली आपल्या एक पोस्टसाठी १.३५ कोटी रूपये घेतो. दरम्यान या अहवालावर अद्याप विराट आणि प्रियांकाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.