मुंबई - लाल बहादुर शास्त्रींवर आधारित चित्रपट 'द ताश्कंद फाइल्स' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक थ्रिलर चित्रपट असणार आहे, जो शास्त्री यांच्या मृत्यूवर आधारित असणार आहे. भारतीय राजकारणात आजही शास्त्री यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न आहेत. याच प्रश्नांना घेऊन 'द ताशकंद फाइल्स' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
काही दिवसांपासून चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात येत होते. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढत असतानाच आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये शास्त्रींच्या मृत्यूमागचं नेमकं कारण आणि राजकारण शोधून काढण्यासाठी चाललेली धडपड, शास्त्रीचं निधन हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचे म्हणणारे आणि ही एक हत्या असल्याचे म्हणणारे, असे दोन गट आपआपसांत वाद घालताना या ट्रेलरमध्ये दिसत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
शास्त्रींच्या आकस्मिक मृत्यूबद्दल अनेक प्रश्न या ट्रेलरमधून उपस्थित केले गेले आहेत. चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, नसरूद्दीन शाह, श्वेता बसु प्रसाद, पंकज त्रिपाठी, विनय त्रिपाठीसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. १२ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.