मुंबई - गेल्या वर्षीच्या कोरोना परिस्थितीवर मात करतोय असे वाटत असतानाच त्या विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढलेय. या वर्षीच्या सुरुवातीला मनोरंजनसृष्टीला हुरूप आला होता आणि शुटिंग्स आणि चित्रपट प्रदर्शन मार्गी लागले असे वाटत होते. गेल्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मची साथ धरणाऱ्या चित्रपटसृष्टीने यावर्षी अनेक सिनेमे चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्याची जोरदार तयारी सुरु केली होती. काही चित्रपट थियेटरमध्ये रिलीजही झाले व काही प्रदर्शनाच्या मार्गावर होते. परंतु पुन्हा आलेली कोरोना लाट, खासकरून मुंबईत, चित्रपटसृष्टीसाठी कर्दनकाळ ठरतेय.
कोरोना-परिस्थिती चिघळल्यामुळे ‘चेहरे’चे प्रदर्शन लांबले अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी अभिनीत बहुप्रतीक्षित रहस्यमय थ्रीलर चित्रपट ‘चेहरे’ने आपले प्रदर्शन पुढे ढकलले आहे. हा चित्रपट येत्या ९ एप्रिलला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार होता. सध्या संपूर्ण देश जात असलेल्या परिस्थितीचा विचार करून व प्रेक्षकांची सुरक्षा लक्षात घेऊन आनंद पंडित मोशन पिक्चर्सने त्यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे, ‘चेहरे’ चे, प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. रुमी जाफरी दिग्दर्शित आणि आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड निर्मित, “चेहरे” मध्ये अन्नू कपूर, क्रिस्टल डिसोजा, धृतिमान चटर्जी, रघुबीर यादव, सिद्धांत कपूर आणि रिया चक्रवर्ती यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.‘लवकरच नवीन रिलीजची तारीख जाहीर केली जाईल’ असे सांगत या निर्णयाबद्दल बोलताना निर्माते आनंद पंडित म्हणतात की, "आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असलेल्या प्रेक्षकांची सुरक्षितता लक्षात घेता आम्ही ‘चेहरे’ चे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या टीमने सिनेमाला उत्तम बनवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आम्ही आमच्या प्रेक्षकांची सिनेमागृहात सुरक्षितपणे येण्याची वाट पाहू. ही परिस्थिती लवकरच टळेल ही आशा.”
हेही वाचा - 'वेल डन बेबी’: पाहा, पुष्कार जोग आणि अमृता खानवीलकरची संवेदनशील मुलाखत