‘लूप लपेटा’ मधील सावी आणि सत्या म्हणजेच तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन यांचे चित्रपटातील अनोखे लूक्स अनावरीत झाल्यानंतर आता या प्रमुख व्यक्तिरेखांचा प्रणयरम्य क्षण नुकताच समोर आला आहे. यात या चित्रपटाचे प्रमुख कलाकार रोमँटिक शैलीत दिसत आहेत.
बी-टाउनची नवीनतम रोमँटिक जोडी, तापसी-ताहीर, या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळेल. ‘लूप लपेटा’ हा जर्मन क्लासिक फिल्म ‘रन लोला रन’ या चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे ज्याचे आधुनिक ‘मिलेनियल’ पद्धतीने कथाकथन करण्यात आले आहे. मूळ चित्रपटात नायिका आपल्या प्रियकराला, जो गंभीर आणि कठीण परिस्थितीत अडकला आहे, वाचविण्यासाठी कुठल्याही थराला जाते व ते सर्व अतिशय थरारक पद्धतीने मांडण्यात आलं होतं व त्यामुळे त्याचा रिमेक कसा असेल याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. ‘लूप लपेटा’ चे गोव्यातील शूट संपुष्टात आले आहे.
प्रख्यात अॅड फिल्ममेकर आकाश भाटिया दिग्दर्शित, हा थरार-प्रवास २०२१ मधेच रिलीज होणार आहे. ‘लूप लपेटा’ हा चित्रपट सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया, एलिसिस एंटरटेनमेंट (तनुज गर्ग, अतुल कसबेकर) आणि आयुष महेश्वरी यांच्या निर्मितीसंस्थांतर्फे बनविला जात आहे.
हेही वाचा - रिक्शा ड्रायव्हरची मुलगी असलेल्या मन्या सिंगचे रिक्शा रॅलीने स्वागत