मुंबई - गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये हिरोलाच अधिक महत्व दिले जाते आणि हिरो हे नेहमी पुरूषच असतात. मात्र, ही परंपरा लवकरात लवकर नष्ट झाली पाहिजे, अशी इच्छा अभिनेत्री तापसी पन्नूने व्यक्त केली आहे. जर चित्रपटसृष्टी आणि भारतीय प्रेक्षकांनी स्त्रीप्रधान चित्रपटांना मोठ्या मनाने स्विकारले तर निश्चितच लवकरात लवकर हा बदल होईल, असेही तापसी म्हणाली.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली की, हिरोचे कोणतेही जेंडर नसते आणि तेच मी माझ्या चित्रपटांमधून सिद्ध करण्याचा प्रयत्न करते आहे. तसेच, आपण गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच साचेबद्ध पद्धतीचे सिनेमे आणि त्याच पद्धतीचे हिरो प्रेक्षकांना देत आलेलो आहोत. बदल एका रात्रीत होणार नाही. तर आपल्या इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींनाच यासाठी पुढाकार घ्यावा लागेल आणि या बदलाचा भागिदार व्हावे लागेल.
तापसीच्या याआधी प्रदर्शित झालेल्या गेम ओव्हर या चित्रपटाला समिक्षकांनी चांगले गुण दिले. मात्र, प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला चांगला व्यावसाय करता आला नाही. या सिनेमात तापसीच मुख्य भूमिकेत होती. चित्रटात हिरो किंवा हिरोईन नाही तर चित्रपटाची पटकथाच खरा हिरो असते. हे तिने यातून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. तिला या सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, जेणेकरून बाकीचे निर्मातेही अशा प्रकारच्या चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतील.
इतर अभिनेत्रींसारखे मला त्याच साचेबद्ध पद्धतीच्या सिनेमांत काम करायला आवडत नाही. जे फक्त बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावतात. मी नेहमीच एक अभिनेत्री म्हणून माझा वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करत आले आणि चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक नेहमीच स्विकारतात, असेही तापसी पुढे बोलताना म्हणाली. तापसीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, लवकरच ती 'सांड की आँख' आणि 'मिशन मंगल' या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.