मुंबई - कंगना रनौतची बहिण रंगोली चंडेलनं ट्विट करत तापसीला सस्ती कॉपी म्हटल्यानंतर आता यावर तापसी काय प्रतिक्रिया देणार, याकडेच सर्वांच लक्ष लागलेलं होतं. अशात आता तापसीनं एका माध्यमाशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
तापसी म्हणाली, मी यावर काहीही बोलणार नाही. मी नेहमी लोकांच्या चांगल्या आणि सकारात्मक बाजूच पाहत असते. त्यामुळे, अशा गोष्टींवर घालवण्यासाठी माझ्याकडे अजिबातही वेळ नसल्याचे तापसीने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण -
बुधवारी कंगना आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला जजमेंटल हैं क्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यावर ट्विट करत तापसीनं या ट्रेलरचं कौतुक केलं होतं. यासोबतच या चित्रपटाकडून नेहमीच खूप अपेक्षा होत्या, असंही तिनं म्हटलं होतं. मात्र, तिनं या ट्रेलरचं कौतुक करताना कंगनाच्या नावाचा कुठेही उल्लेख का केला नाही? असा सवाल करत कंगनाची बहिण रंगोलीनं तापसीला चांगलंच सुनावलं होतं.
काही लोक कंगनाला कॉपी करूनच आपलं दुकान चालवतात. मात्र, कंगनाच्या एखाद्या चित्रपटाची प्रशंसा करताना तिच्या नावाचा उल्लेखही ते करत नाहीत. मागच्या वेळी मी तापसीचं बोलणं ऐकलं तेव्हा कंगनाला डबल फिल्टरची गरज असल्याचे तिने म्हटले होते. तापसी तू सस्ती कॉपी करणं थांबवायला हवं, असं रंगोलीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.