नवी दिल्ली - म्युझिक कंपनी टी-सिरीजने समाज माध्यमातील काही व्हिडीओ साइट्सना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यात बोलो इंडिया, मित्रों, एम एक्स प्लेअरचे टकाटक, थ्रीलर अॅण्ड जोश यांचा समावेश आहे. कॉपीराईटचा भंग करून टी-सिरीजचे काम या साइट्सनी आपल्या प्लॅटफार्मवर वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कॉपीराइटचा भंग केल्या प्रकरणी या साइट्सनी टी-सिरीजला प्रत्येकी ३.५ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही कंपनीने केली आहे.
टी-सिरीजने चिनी व्हिडीओ अॅप 'स्नॅक व्हिडीओ'लाही नोटीस पाठवली असून रोपोसो या व्हिडीओ अॅपविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टी-सिरीजच्या कायदेशीरबाबी सांभाळणाऱ्या 'इरा लॉ फर्म'ने व्हिडीओ साइट्सला नोटिसा बजावल्या असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आमच्या साइटवर युजर जनरेटर कंटेट असतो. भारताने चिनी अॅप्सवर बंदी घातल्याने अनेक युजर्सनी त्या अॅप्सवर अगोदर तयार केलेले व्हिडीओज् आमच्या साइटवर टाकण्यास सुरुवात केली. ही बाब आमच्या लक्षात येताच आम्ही असे व्हिडीओ काढून टाकण्यास सुरुवात केली आहे, असे 'बोलो इंडिया'चे संस्थापक वरूण सक्सेना यांनी सांगितले.