मुंबई - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यानंतर सर्वत्र त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात ४० पेक्षा जास्त जवानांना वीरमरण आले. या हल्ल्यानंतर सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिज या म्यूझिक कंपनीने पाकिस्तानी गायकांचे गाणे असलेला व्हिडिओ आपल्या यू-ट्यूब चॅनेलवरून हटवला आहे. काय होता 'मनसे'चा इशारा - भारतातील खास करून मुंबईतील म्यूझिक कंपन्यांनी पाकिस्तानी गायकांसोबत काम करणे थांबवावे. या इशाऱ्यानंतर संगीत क्षेत्रात हालचाली सुरू झाल्या होत्या. त्याचाच परिणाम म्हणून टी-सीरिजने व्हिडिओ हटवला आहे.
मनसे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले, की 'टी-सीरिज, सोनी म्यूझिक, टिप्स म्यूझिक यांसारख्या कंपन्यांनी पाकिस्तानी गायकांसोबत काम करणे थांबवावे, अन्यथा मनसे स्टाईल दणका दिला जाईल'. त्यानंतर भूषण कुमार यांच्या टी-सीरिजने राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम यांच्या गाण्याचे व्हिडिओ हटवल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
अलिकडेच त्यांनी या दोन्हीही गायकांसोबत वेगवेगळ्या गाण्यांसाठी करार केला होता.