मुंबई - सुशांतसिंह राजपूत आणि त्याची कथित गर्लफ्रेंड रिहा चक्रवर्ती हे लेखक दिग्दर्शक रुमी जाफरी यांच्या आगामी चित्रपटात एकत्र झळकणार होते. या चित्रपटाची तयारी पूर्ण झाली होती आणि मे महिन्यात याचे शूटिंग सुरू होणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे शूटिंग लांबणीवर पडले होते.
सुशांत हा शाहरुख खान आणि गोविंदाचा मोठा चाहता होता. त्यामुळे रुमीने सुशांतच्या डान्सिंग स्किलचा या सिनेमात पुरेपूर उपयोग करून घ्यायचे ठरवले होते. या न घडलेल्या चित्रपटाविषयी बोलताना रुमी जाफरी म्हणाले, ''या रोम-कॉममध्ये सुशांतच्या डान्सिंग स्किलचा वापर करायचा होता. तो उत्कृष्ट डान्सर होता आणि माझा चित्रपट त्याला वेगळ्या प्रकारे त्याच्या या गुणावर प्रकाशझोत टाकणार होता. त्याला शाहरुख खानची अॅक्टींग आवडायची आणि गोविंदाचा डान्स. त्यामुळे मी गोविंदाच्या स्टाईलने डान्सच्या गाण्यावर मुहूर्त करण्याचे ठरवले होते.''
रुमी जाफरीने कबूल केले की, हा चित्रपट तो पुन्हा बनवू शकणार नाही. याबद्दल तो म्हणाला, ''मी पुन्हा बनवू शकणार नाही, कारण हा चित्रपट मी सुशांतला डोळ्यासमोर ठेवून लिहिला होता.''
सुशांतने याची स्क्रिप्ट लॉकडाऊनच्या काळात वाचली होती आणि त्याला तातडीने काम सुरू करायचे होते, असेही रुमी यांनी सांगितले.
रुमी जाफरीने हाही खुलासा केला की, सुशांतचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये फार दोस्त नव्हते. त्याने लवकरच संपर्क करण्याचे आश्वासन दिले होते. त्याने पाठवलेल्या अखेरच्या संदेशामध्ये त्याने, ''चार ह्रदयांची चिन्हे आणि लव्ह यू सर'' असे लिहिले होते.