मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनने दिल्लीच्या युवकाची माफी मागितली आहे. दिलजीत दोसांझच्या 'अर्जुन पटियाला' या चित्रपटात सनीची छोटी भूमिका आहे. त्यात ती आपला फोन नंबर सांगते. हा फोन नंबर अनेकांनी लिहून घेतला आणि त्यावर सनीला बोलण्यासाठी चाहत्यांनी फोन करण्याचा झपाटा लावला. यामुळे दिल्लीतील तरुण पुनित अग्रवाल वैतागला आणि त्याने चक्क पोलीस स्टेशन गाठले. या पार्श्वभूमीवर सनीने पुनितची माफी मागितली आहे.
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्यावेळी सनीने माफी मागितली. 'हा प्रकार तुमच्याबाबतीत घडेल असे वाटले नव्हते. लोक तुम्हाला फोन करतील असेही वाटले नव्हते, मला माफ करा,' अशा शब्दात तिने माफी मागितली आहे.
'अर्जुन पटियाला' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुनित अग्रवालला फोन येण्यास सुरुवात झाली. मेसजचाही धुरळा उडाला. पुनित म्हणतो, "सिनेमा २६ जुलैला रिलीज झाला आणि अज्ञात फोन नंबरवरुन फोन येण्यास सुरुवात झाली. सर्वजण सनी लिओनीशी बोलायचे आहे असे म्हणत होते. सुरुवातीला कोणीतरी माझी गंमत करत आहे असे वाटले. नंतर माझ्या लक्षात आले की, सिनेमावाल्यांनी माझ्या नंबरचा वापर केलाय. सनी लिओनीच्या तोंडी माझा नंबर देण्यात आलाय."
"अनेक फोन्समुळे मी वैतागून गेलो. लोक मला छळू लागले. मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे मात्र अजून कारवाई झालेली नाही." , असेही पुनित म्हणाला.
दरम्यान सनी लिओनने माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सनी आगामी मळ्यालम चित्रपट 'रंगीला' आणि तामिळ चित्रपट 'वीरम्मादेवी'मध्ये झळकणार आहे.