मुंबई - दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता सुभाष घई यांच्या चित्रपटांनी गेली तीन दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून घईंनी दिग्दर्शनातून काढता पाय घेतला असून सध्या ते निर्मिती क्षेत्रात सक्रीय झाले आहेत. नुकतंच ईटीव्ही भारतला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातून बाहेर पडण्याचे कारण सांगितले आहे.
सुभाष घई हे २०१४ सालापासून सिनेसृष्टीपासून दूर आहेत. याबाबत घई म्हणाले, माझ्या तीन दशकांच्या करिअरमध्ये सुरुवातीला चित्रपटाचा निर्माताच वन मैन कमांडर असायचा. मात्र, आता सिनेमाच्या यशासाठी निर्मात्याशिवाय इतरही अनेक लोक नेमले जातात.
याशिवाय माझं वयही दिग्दर्शनापासून लांब जाण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण असल्याचं त्यांनी म्हटलं. सिनेसृष्टीसोबतचं आपलं नातं शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, दिग्दर्शकाच्या रुपात असणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.