लखनौ - मेघना गुलजार दिग्दर्शित आणि दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेल्या 'छपाक' हा चित्रपट आज देशभर प्रदर्शित झाला. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समुहाने हा चित्रपट पाहिला. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्यांनीही पोस्टर्स झळकवत चित्रपटच्या प्रदर्शनाला पाठिंबा दिला.
दीपिका पदुकोणने जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर 'छपाक' चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मोहिम सुरू झाली होती.
समाजवादी पक्षाच्या सिनिअर नेत्याने सांगितले, ''आम्ही हा चित्रपट पाहिला कारण आमचे नेते अखिलेश यादव यांनी अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या पीडितांचे दुःख समजून घेतले आहे. ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शिरोज हँगआऊट कॅफे या अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या पीडितांनी चालवलेल्या कॅफेला प्रोत्साहन दिले होते.''
दीपिका पदुकोणने ५ जानेवारीला आपला वाढदिवस लखनौच्या शिरोज हँगआऊट कॅफेमध्ये साजरा केला होता.
'छपाक' चित्रपटाची कथा अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या सत्यकथेवर आधारित आहे.
अखिलेश यादव यांनीदेखील कार्यकर्त्यांसह 'छपाक' हा चित्रपट पाहिला.
दरम्यान काँग्रेस पक्षाच्या शैलेंद्र तिवारी यांनी पोस्टर्स झळकवत 'छपाक' चित्रपटाच्या प्रदर्शनाला पाठिंबा दर्शवला.