मुंबई - कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर देशाबाहेरून आलेल्या प्रवाशांना मुंबईत क्वारंटाईन केले जात आहे. बॉलिवूड कलाकार सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करतील. सध्या त्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
नवा स्ट्रेन, क्वारंटाइन
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोना विरोधात लढाईत विजय मिळत असतानाच ब्रिटन येथे नवा कोरोना स्ट्रेन आढळून आला. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटन आणि युके येथून येणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जात आहे. तर, इतर देशातून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. मुंबईकरांना या प्रवाशांच्या माध्यमातून नव्या कोरोनाची लागण होऊ नये अशी त्या मागची भूमिका आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची भीती असताना बड्या बॉलिवूड कलाकारांकडून मोठा हलगर्जीपणा होताना दिसत आहे. बॉलिवूड कलाकार सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान हे २५ डिसेंबरला यूएईतून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. त्यांना नियमाप्रमाणे क्वारंटाईन करता यावे म्हणून पंचतारांकित ताज लॅन्ड्स हॉटेलमध्ये २४ आणि २५ डिसेंबरचे बुकिंग करण्यात आले होते. मात्र, ते तिघेही हॉटेलला न जाता परस्पर घरी गेल्याचे उघडकीस आले आहे.
सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल
२६ डिसेंबरपासून सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान यांचे ताज लॅन्ड्स हॉटेलमधील आरक्षण रद्द झाल्याची माहिती हॉटेल व्यवस्थापणाने पालिकेला दिली. देशाबाहेरून आलेल्या व्यक्तीने ७ दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन या तिघांनी केले. आपल्या आजूबाजूच्या नागरिकांना कोरोनाचा प्रसार होऊ शकतो असे वर्तन त्यांनी केले. यासाठी साथ नियंत्रण कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय दंड सहिता १८६० अन्वये गुन्हा दाखल करावा, असे पालिकेने खार पोलिसांना कळविले होते. त्यानुसार सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना पालिकेच्या आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे. मुंबई पोलीस साथ नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने योग्य ती कारवाई करेल असे काकाणी यांनी सांगितले. या तिघांकडे निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आहे. सात दिवसांनी टेस्ट केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्यावर नियमानुसार उपचार केलं जातील. त्यानंतर त्यांना सात दिवस होम क्वारंटाइन ठेवले जाईल असे काकाणी यांनी सांगितले.
हेही वाचा - रिचा चढ्ढाचा "मॅडम चीफ मिनीस्टर" चित्रपट २२ जानेवारीला होणार थिएटरमध्ये रिलीज