मुंबई - बॉलिवूड अभिनेता दिवंगत सुशांत सिंह राजपूतचा रूममेट आणि नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत आरोपी असलेल्या सिद्धार्थ पिठानी याने लग्न करण्यासाठी विशेष कोर्टाकडून जामीन मागितला आहे.
सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणत सिद्धार्थ पिठानी याला या आधी मुंबईतील कोर्टाने न्यायालयीन कोठडीत धाडले होते. २८ मे रोजी सिद्धार्थ पिठानीला हैदराबाद कोर्टातून ट्रान्झिट वॉरंट मान्य झाल्यावर तेथून मुंबई कोर्टात हजर केले आणि न्यायालयाने सिद्धार्थला एनसीबी कोठडीत पाठवले होते आता सिद्धार्थ पिठानी न्यायालयीन कोठडीत आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली होती. ड्रग्स प्रकरणात ही अटक करण्यात आली. सिद्धार्थ पिठानीला हैदराबाद येथून अटक केल्याचे सांगण्यात आले होते.
पिठानीचे वकील एॅडव्होकेट तारिक सय्यद यांच्यामार्फत दाखल केलेल्या जामीन अर्जात पिठानी याने असे नमूद केले, की कोणत्याही प्रतिबंधित पदार्थांचा साठा तसेच वापर केल्याचे आढळलेले नाही. शिवाय, कोणतेही मादक द्रव्य किंवा सायकोट्रॉपिक पदार्थाच्या व्यवहारात तो सामील होता असे सूचित करण्यासाठी कोणतीही सामग्री नव्हती.
या प्रकरणातील सह-आरोपींना त्यांच्याकडे काही पदार्थ व्यावसायिक प्रमाणात ताब्यात घेण्यात आले आहे की नाही याची पर्वा न करता जामिनावर सोडण्यात यावे असा दावा पिठानी यांनी केला आहे.
सुशांत आणि सिद्धार्थचे कनेक्शन
सिद्धार्थ पिठानी दिवंगत सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत त्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. सिद्धार्थने सर्वात पहिल्यांदा सुशांतचा मृतदेह पहिला होता. सुशांत सिंह राजपूतचे १४ जून २०२० रोजी निधन झाले. त्याने मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास लावून घेतला. सुशांतच्या मृत्यूने सर्वांना हादरवून सोडले. सुशांतच्या कुटुंबीयांनीही त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप केले होते. सुशांत मृत्यू प्रकरणातील तपासादरम्यान ड्रग्स अँगलही समोर आला. या प्रकरणाची अंमलबजावणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो करीत आहे. यात रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती अशा बर्याच जणांची नावे समोर आली होती. सिद्धार्थ पिठानीदेखील त्यापैकी एक होता. आता एनसीबीने त्याला अटक केली आहे.
हेही वाचा - इटालियन आर्टिस्टनं विकलं 'अस्तित्वात' नसलेलं शिल्प; रितेश देशमुख म्हणतो, खरे कलाकार तर आम्हीच!