वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील आनंदाचा दिवस असतो, मग तो सामान्य माणूस असो वा फिल्मस्टार. हा दिवस शक्यतो प्रत्येकजण आपले कुटुंबपरिवार आणि जवळच्या लोकांसोबत साजरा करण्यास प्राधान्य देतो. कोणताही शो करताना त्यातील अनेकजण एकमेकांचे आजन्म मित्र बनतात, परिवाराचा एक भाग बनतात आणि कार्यक्रमाची संपूर्ण टीम एका परिवारासारखीच राहत असते. सध्याच्या कोविड काळात तर सेटवर बाहेरील कोणालाही प्रवेश वर्ज्य असल्यामुळे तर या परिवाराचे नातेसंबंध अधिकांश घट्ट झालेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा चा वाढदिवस ८ जूनला असतो आणि ती सध्या परीक्षक असलेल्या सुपर डान्सर चॅप्टर ४ च्या परिवारासोबत तिने तो साजरा केला. ‘सुपर डान्सर’च्या टीमने तिचा बर्थडे जल्लोषात साजरा केला.

शिल्पा शेट्टी कुंद्रा ही योग एक्स्पर्ट आहे आणि सोशल मीडियावर ती अनेकांना त्याबाबत मार्गदर्शन करीत असते. तिचे ‘योग-व्हिडीओज’ तुफान लोकप्रिय आहेत. शिल्पा नेहमीच एक आघाडीची हिरॉईन होती परंतु राज कुंद्राबरोबर झालेल्या लग्नानंतर आलेल्या मातृत्वाला महत्व देत तिने चित्रपटांतून ‘सुट्टी’ घेतली होती. आता तब्बल १२ वर्षांच्या गॅपनंतर शिल्पा ‘निकम्मा’ या चित्रपटातून अभिनय-पुनरागमन करीत आहे. मधल्या काळात तिने अनेक रियालिटी शोजमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिलंय. सध्या ती कोरियोग्राफर गीता कपूर आणि दिग्दर्शक अनुराग बसू सोबत ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मध्ये परीक्षकाची भूमिका निभावतेय.

सुपर डान्सर चॅप्टर ४ या डान्स रियालिटी शोमध्ये या वीकएंडला एक दिमाखदार सेलिब्रेशन दिसून येणार आहे. या भागांत ‘गुरु-शिष्य की अदलाबदली’ ही थीम आहे, त्यामुळे या भागात प्रेक्षक स्पर्धकांना आपल्या ‘बदली’ गुरुसमवेत वेगळी डान्स स्टाइल आजमावताना दिसतील. शिवाय, शिल्पा शेट्टी कुंद्राचा वाढदिवस साजरा करताना सुपर डान्सर चॅप्टर ४ च्या छोट्या स्पर्धकांनी आणि त्यांच्या गुरूंनी केलेली धमाल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सर्वांनी शिल्पा शेट्टी कुंद्रा चा वाढदिवस जल्लोषात साजरा केला आणि शूटिंग दरम्यान हे समजल्यानंतर, हे सर्व अनपेक्षित असल्यामुळे, शिल्पाला सुखद आश्चर्याचा धक्का बसला होता.

‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ हा डान्स रियालिटी शो दर शनिवारी आणि रविवारी रात्री सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो.
हेही वाचा - मानहानी प्रकरण; सलमान खानचा न्यायालयात नव्याने अर्ज दाखल