मुंबई - ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी हे देशद्रोही असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने अलिकडेच केले आहे. यावर आता शबाना आझमींकडून प्रत्युत्तर आले आहे. 'देशात सध्या अशी परिस्थीती असताना वैयक्तिक टीकेला काही अर्थ आहे का? देव तिचं भलं करो', असे त्यांनी म्हटलं आहे.
जेव्हा देश एकत्र येऊन पुलवामा येथील हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांबाबत दु:ख व्यक्त करत आहे, या हल्ल्याचा निषेध करत आहे, अशात कंगनाने मला लक्ष्य करून टीका करणे धक्कादायक असल्याचे शबाना आझमी एका मुलाखतीदरम्यान म्हणाल्या.
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडमधून अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. पुलवामा हल्ल्याबाबतही तिने तिचा तीव्र संताप व्यक्त केला. मात्र, याबरोबरच तिने शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप करत हल्लाबोल केला होता.
शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना पाकिस्तान येथील एका कार्यक्रमाचे निमंत्रण आले होते. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी पाकिस्तानच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले. तरीही कंगनाने त्यांच्यावर टोकाची प्रतिक्रिया उमटवली होती.
पुलवामा हल्ल्याबाबत बोलत असताना कंगना म्हणाली होती, की जावेद अख्तर आणि शबाना आझमी हे पाकिस्तानशी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आदानप्रदान करतात. हे तेच लोक आहेत, जे 'भारत तेरे तुकडे होंगे' म्हणणाऱ्यांचे समर्थन करतात. 'उरी' हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही, यांना पाकिस्तानमध्ये जाऊन कार्यक्रम करण्याची काय गरज आहे? असा प्रश्नही तिने उपस्थित केला होता.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)