मुंबई - .जम्मू आणि काश्मिर मधील पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची तीव्र प्रीतिक्रिया बॉलिवूडमधून उमटली आहे. अभिनेत्री शबाना आझमी आणि कवी गीतकार जावेद अख्तर यांनी आपला पुढील महिन्यातील पाकिस्तान भेट रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.
शबाना आझमी यांचे वडील दिवंगत शायर कैफी आझमी यांच्या स्मृती प्रित्यर्थ कराचीत दोन दिवसांच्या खास कार्यक्रमच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून कैफी आझमी यांचा काव्याला उजाळा देण्यात येणार होता. कराची आर्ट कौन्सिलने या कार्यक्रमच आयोजन केले होते. त्यात जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांना खास आमंत्रित करण्यात आलं होतं.
मात्र पुलवामा येथील सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटद्वारे या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना शहीद जवानांच्या कुटुंबियाप्रति आपली सहवेदना व्यक्त केली आहे.
जावेद अख्तर यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सीआरपीएफशी आपलं फार जून नातं असून त्याच समूह गीत आपण लिहिलं असल्याचं सांगितलंय. त्यावेळी आपण अनेक अधिकाऱ्यांना भेटलो होतो आणि त्यांच्यावरील जबाबदारीची आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचं मत व्यक्त केलंय. त्यासोबतच स्वतः कैफी साहेबांनी 1965 च्या भारत पाक युध्दावेळी 'और फिर कृष्ण ने अर्जुन से कहा' ही गाजलेली कविता लिहिली होती.
अशात या कार्यक्रमाला जाणं त्यांनाही पटलं नसत त्यामुळेच आम्ही या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे या दोघांनी स्पष्ट केलंय.