मुंबई - अभिनेत्री सारा अली खानने केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर सारानं सिंबा या सिनेमात भूमिका साकारली होती. या सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. मात्र, यात साराचा रोल अगदीच कमी वेळाचा होता.
या रोलवर आता सारानं प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या चित्रपटात काम करताना तुमचा रोल किती लहान आणि मोठा आहे, हे पाहण्यापेक्षा एक कलाकार म्हणून चित्रपटाची कथा काय आहे, हे पाहणं अधिक गरजेचं असल्याचं तिनं म्हटलं आहे. किंवा अनेकवेळा तुम्ही चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत, हे पाहून त्याची निवड करता, असं ती म्हणाली.
सिंबा चित्रपटात काम करण्यामागचं कारण सांगताना सारा म्हणाली, रोहित सर यांच्यासोबत काम करण्याची माझी खूप इच्छा होती. सुरुवातीपासून मी रोहित शेट्टी यांच्या कामाची मोठी चाहती होते. त्यामुळे केदारनाथनंतर या सिनेमात काम करणं माझ्यासाठी एक नवी संधी होती. दरम्यान, सारा लवकरच लव आज कल सिनेमाच्या सिक्वलमध्ये कार्तिकसोबत झळकणार आहे.