हैदराबाद: बॉलीवूडचा सुपरस्टार आणि सर्वांचा चाहता असलेल्या सलमान खानच्या सुपरहिट टाइगर सीरीजच्या तिसऱ्या 'टायगर 3' (Tiger 3) चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. या चित्रपटाच्या शुटिंगसाठी तो आणि कतरिना हे शुक्रवारी रशियाला रवाना झाले होते. 'टायगर 3' (Tiger 3) चित्रपटाच्या सेटवरील सलमान खानचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे.
'टायगर 3' चा लूक व्हायरल -
सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) 'टायगर 3' (Tiger 3) या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. सलमान आणि कतरिना रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये 'टायगर 3' चं शूटिंग करत आहेत. रशियाला पोहचताच ते अॅक्शन सीक्वेन्स शूट करत आहेत. यामध्ये सलमान एका कारचा पाठलाग करणारा सिक्वन्स शूट करत आहे. सलमानचा लूक चित्रपटाच्या सेटवरून व्हायरल झाला आहे या लूकमध्ये सलमान एकदम डॅशिंग दिसत आहे.
असा आहे सलमानचा 'टायगर 3' मधील लूक -
सलमान खानच्या एका चाहत्याने इंस्टाग्रामच्या अकाउंटवर सलमान खानचा 'टायगर 3' या चित्रपटाचा पहिला लुक शेयर केला आहे. सलमान खानच्या व्हायरल लुकमध्ये तो लांब तपकिरी केस आणि दाढीमध्ये दिसत आहे. यासोबतच त्यानं कपाळावर लाल पट्टी बांधली आहे. या लूकमध्ये सलमान खानला ओळखणं कठीण होत आहे. त्याचे हे फोटो आता तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सलमान खानसोबत त्याचा भाऊ सोहेल खानचा मुलगा निर्वाण खानही दिसत आहे.
दिली चाहत्यांना सेल्फी -
दुसऱ्या फोटोमध्ये सलमानचे चाहते रशियात त्याच्यासोबत सेल्फी घेत आहेत. सलमान खानच्या फॅन पेजनुसार, अभिनेता यावेळी कारचा पाठलाग करणारा सीन शूट करत होता. सलमानचा लूक पाहून चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस -
एका चाहत्याने या फोटोंवर कमेंट करत लिहिलं - भाईजान काय दिसताय… दुसरीकडे, आणखी एका चाहत्यानं लिहिलं - 2022 ईदला धमाका होणार असं दिसतंय.
अशी आहे टायगर सिरीज -
टायगर 3 हा 2022 मध्ये रिलीज होईल. हा 2022 मधील सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे तुर्की ऑस्ट्रियासह पाच देशात या चित्रपटाचे शुटिंग होणार आहे. टायगर फ्रँचायझीमधील हा तिसरा चित्रपट आहे. पहिला चित्रपट 'एक था टायगर', दुसरा 'टायगर जिंदा है' आणि तिसरा 'टायगर 3' असेल. चित्रपटाचा पहिला भाग कबीर खान यांनी दिग्दर्शित केला होता आणि दुसरा भाग अली अब्बास जफर यांनी केला होता.