मुंबईः अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने नुकतीच सुशांत सिंग राजपूतची प्रेयसी असल्याची कबुली दिली आहे. तसेच सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी गृहमंत्री अमित शहा यांना आग्रह केल्याचे तिने सांगितले.
रियाने सुशांतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करीत पोस्टमध्ये लिहिलंय, "आदरणीय अमित शाह सर, मी सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आहे. त्याच्या अचानक निधनानंतर आता महिनाभराचा कालावधी झाला आहे. मला सरकारवर पूर्ण विश्वास आहे, तथापी, न्यायाच्या हितासाठी, मी तुम्हाला हात जोडून या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू करण्याची विनंती करते. सुशांतने हे पाऊल उचलण्यास कोणता दबाव होता, हे मला फक्त समजून घ्यायचे आहे. विनम्र, रिया चक्रवर्ती. "
सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर रियाने शोक व्यक्त करणारी पोस्ट लिहिली होती. त्यावर सोशल मीडियातून तिच्यावर भरपूर टीका झाली होती.
रियाला बलात्काराच्या आणि हत्येच्या अनेक धमक्या मिळाल्या होत्या. याबद्दल तिने लिहिलंय, "तुम्ही काय म्हणत आहात याचे गांभीर्य तुम्हाला आहे? हा गुन्हा आहे आणि कायद्यानुसार कोणीही, मी पुन्हा सांगते कोणीही या प्रकारे विषारीपणाचा छळ करु नये."
सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिमेच्या स्वरुपात मागणी केली जात आहे. सुशांतवर अन्याय केलेल्या अनेक बॉलिवूड निर्मात्यांवर आरोप केले जात आहेत.
हेही वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरणी रियाची ९ तास चौकशी, 'या' गोष्टींचा झाला खुलासा!
यापूर्वी १५ जून रोजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते की त्यांनी वकील आणि राजकीय विश्लेषक इश्करनसिंग भंडारी यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून हे प्रकरण सीबीआयच्या तपासणीसाठी योग्य आहे की नाही याची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
सुशांतच्या मृत्यू प्रकरणी रिया, संजना सांघी, शेखर कपूर, संजय लीला भन्साळी यांच्यासह दिवंगत अभिनेत्याचे अनेक मित्र आणि कुटुंबातील सदस्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.