मुंबई - लोकसभा निवडणूकांसाठी तीन टप्प्यांतील मतदान पार पडलं आहे. तर येत्या २९ एप्रिलला मुंबईच्या विविध मतदारसंघात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आपलं मत नोंदवण्यास सांगणारा एक व्हिडिओ रेणूका शहाणेंनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे.
यात रेणूका शहाणे मराठीतून मुंबईतील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. २९ एप्रिलला मुंबईत मतदान आहे. त्यामुळे एक जागरुक नागरिक असल्याची जबाबदारी नक्की पार पाडा. कृपया मतदान करा, असे त्यांनी यात म्हटले आहे. या ट्विटवर रिप्लाय करत एकाने म्हटले आहे. मॅम तुमचा तो मल्ल्याळममधील मेसेज समजला नाही.
यावर सडोतोड उत्तर देत तो मेसेज मल्ल्याळम नव्हे तर माझी मातृभाषा असलेल्या मराठीत असल्याचे रेणूका यांनी म्हटले आहे. यात न समजण्यासारखं काय आहे? आणि तसंही मी कॅप्शनमध्ये मतदान करण्याचा संदेश हिंदीत दिला आहे, तर निश्चितच मी त्याबद्दलच बोलत असणार ना, असं उत्तर रेणूका शहाणे यांनी या व्यक्तीला दिलं आहे.