मुंबई - अभिनेत्री राधिका आपटेने अनेक सिनेमांत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. आता राधिकाने स्लिपवॉकर या लघूपटाद्वारे दिग्दर्शनातही पदार्पण केलं आहे. अशात आता या शॉर्टफिल्मला पाल्मस स्प्रिंग आंतरराष्ट्रीय शॉर्ट फेस्टिवलमध्ये अॅवॉर्ड जाहीर झाला आहे. शॉर्टफिल्मला बेस्ट मिडनाईट शॉर्ट अॅवॉर्ड मिळाला आहे.
या पुरस्कारासाठी राधिकाने पाल्मस स्प्रिंग आंतरराष्ट्रीय शॉर्ट फेस्टिवच्या आयोजकांचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार मिळाल्याने खूप आनंदी असल्याचं अभिनेत्रीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. तर, नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत राधिका म्हणाली, शॉर्टफिल्मच्या दिग्दर्शनाच्या कामाचा मी भरपूर आनंद घेतला.
पुढे राधिका म्हणाली, मी याबद्दल खूपच उत्सुक आहे, कारण लवकरच प्रेक्षक ही शॉर्टफिल्म पाहाणार आहेत. दिग्दर्शक म्हणून मला आणखी काम करण्याची संधी मिळेल, अशी आशा तिनं व्यक्त केली. या लघूपटात शहाना गोस्वामी आणि गुलशन देवैया यांच्या मुख्य भूमिका आहेत. कथा लेखन आणि दिग्दर्शन राधिकाने केलं आहे.