मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टी साक्षीदार आहे. तसेच पोर्नोग्राफीबाबत वापरल्या जाणाऱ्या हॉटशॉट्स अॅपचा सूत्रधार राज कुंद्रा हाच असल्याचे आढळून आले आहे. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान या प्रकरणावर आज (16 सप्टेंबर) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शिल्पा शेट्टी साक्षीदार -
पोर्नोग्राफी प्रकरणात कालच (15 सप्टेंबर) राज कुंद्रा आणि इतर १३ आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी मुख्य महानगर दंडाधिकारी, ३७ वे न्यायालय, किल्ला कोर्ट, मुंबई यांच्या न्यायालयात एकूण ४९९६ पानांची चार्जशीट दाखल केली आहे. यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रा आणि इतर ४३ जणांचे जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवले आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा विरोधात पोर्नोग्राफी प्रकरणात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात शिल्पा शेट्टीचे साक्षीदार म्हणून नाव आहे. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत.
ब्रेक देण्याच्या बहाण्याने अश्लिल चित्रफिती -
फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास इच्छुक तरुणींना ब्रेक देण्याच्या बहाण्याने अश्लिल चित्रफिती बनवून त्या प्रसारीत करणाऱ्या पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीबाबत माहिती प्राप्त झाली. यामुळे ०४ फेब्रुवारी २०२१ रोजी मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखा यांनी पर्दापाश करून मालवणी पोलीस ठाणे गु.र.क्र. १०३ / २०२१ गुन्हा नोंद करून ५ आरोपींना अटक केले होते. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान एकूण ९ आरोपींना अटक करून त्यांच्याविरुध्द ०१ एप्रिल २०२१ रोजी न्यायालयात एकूण ३५२९ पानांची चार्जशीट दाखल केली. तसेच, कलम १७३ (८) फौ.दं.प्र.सं. अन्वये तपास सुरु होता.
पॉर्न फिल्मबाबत बरेच पुरावे -
पॉर्न केसमधील मुख्य सूत्रधार याचा मालमत्ता कक्षामार्फत तपास सुरु असताना तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण, साक्षीदारांचे जबाब व जप्त कागदपत्रांवरुन हॉटशॉटस् अॅपचा सूत्रधार राज कुंद्रा हाच असल्याचे आढळून आले. न्यायालयाकडून सर्च वॉरन्ट प्राप्त करून राज कुंद्रा याच्या अंधेरी येथील कार्यालयाची झडती घेतली. त्यामध्ये पॉर्न फिल्मबाबत बरेच पुरावे प्राप्त झाले. त्याआधारे रिपू सुदन कुंद्रा उर्फ राज कुंद्रा व त्याचा विआन इंडस्ट्रीज कंपनीतील आय.टी.हेड रायन जॉन थॉर्प याला दाखल गुन्ह्यात 19 जुलै 2021 रोजी अटक करण्यात आली आहे.
लाखो रुपयांची कमाई -
संबंधीत दाखल गुन्ह्याच्या तपासात अटक केलेल्या २ आरोपींनी यापूर्वी अटक केलेले आरोपीशी संगनमत करून फिल्म लाईनमध्ये स्ट्रगल करणाऱ्या नवोदित तरुणींच्या कमकुवत आर्थिक परिस्थिती व असहायत्तेचा गैरफायदा घेवून त्यांचे अश्लिल चित्रीकरण केले. ते अश्लिल व्हिडिओ विविध वेबसाईट्स तसेच मोबाईल अॅप्लीकेशन्सवर अपलोड केले. या अश्लिल व्हिडिओंची सबस्क्रिप्शनद्वारे विक्री करुन अश्लिल मजकूर ऑनलाईन प्रसारीत करण्यात आला. ते अश्लिल व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन चार्जेस घेवून गैर मार्गाने लाखो रुपयांची कमाई केली. यात महिलांना नाममात्र मोबदला किंवा काही वेळेस काहीही मोबदला न देता त्यांची फसवणूक केली. तसेच याच गुन्ह्यातील महत्वाचा पुरावा असलेले व्हॉट्स अॅप चॅट व ई-मेल स्वतःचे मोबाईल फोन व लॅपटॉप मधून दोन अटक आरोपींनी पुरावे नष्ट केले आहेत.
एकूण ४९९६ पानांचे दोषारोपपत्र -
या प्रकरणात अटक आरोपी रिपू सुदन कुंद्रा उर्फ राज कुंद्रा व रायन जॉन थॉर्प तसेच सिंगापूर येथे राहणारा वॉन्टेड आरोपी यश ठाकूर उर्फ अरविंदकुमार श्रीवास्तव व लंडन येथे राहणारा परदिप बक्शी यांच्याविरुध्द अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, ३७ वे न्यायालय, किल्ला कोर्ट, मुंबई यांच्या न्यायालयात १५ सप्टेंबर २०२१ रोजी एकूण १४६७ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे नमूद गुन्ह्यात एकूण १३ आरोपींविरुध्द एकूण ४९९६ पानांचे चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
आज सुनावणी -
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा १९ जुलै २०२१ पासून तुरुंगात आहे. त्याला अश्लील चित्रपट बनवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज १६ सप्टेंबरला सत्र न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. ८ सप्टेंबर रोजी राज कुंद्राच्या वकिलांनी न्यायालयाकडून पुढील तारखेची मागणी केली होती. त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख १६ सप्टेंबर देण्यात आली होती.
हेही वाचा - आव्हाडांचा गावस्करांना बाउन्सर, तीन वर्षात म्हाडाच्या भूखंडावर अकादमी सुरू करण्याचे आदेश