नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वीच गायिका नेहा कक्करने गायकांना गाण्यासाठी पैसे मिळत नसल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. यावर आता आदित्य नारायणची प्रतिक्रिया आली आहे. बॉलिवूडमध्ये गायकांना एक पैसाही मिळत नसल्याचे आदित्यने स्पष्ट केले आहे.
नेहा कक्करने माध्यमासोबत बोलताना सांगितले, की बॉलिवूडमधील गाणी गाण्यासाठी आम्हाला पैसे मिळत नाहीत. गाणं हीट झाल्यास गायकाला शो आणि लाईव्ह कॉन्सर्टमधून पैसे मिळतात. मात्र, बॉलिवूड गाण्यासाठी पैसै देत नाही.
यावर आदित्य नारायणने मत मांडले आहे. त्यानी म्हटलं की, आम्हाला गाण्यासाठी एक पैसाही मिळत नाही. कोणीच कोणतेही काम मोफत किंवा विना मोबदला करु नये. मी केवळ संगीत क्षेत्राबद्दल नाही, तर सर्वांनाच हे सांगत आहे, की विना मोबदला काहीही करु नका.
पुढे तो म्हणाला, आता एक नवीनच गोष्ट समोर आली आहे, की तुम्हाला एक्सपोजर मिळेल. त्या एक्सपोजरचे मी काय करु, जेव्हा माझ्याकडे घर चालवण्यासाठी आणि घरच्या गरजा पूर्ण करण्यासाठीही पैसे नसतील. त्यामुळे, कृपया हे सर्व थांबवा. असं म्हणत आदित्यने खंत व्यक्त केली आहे
..म्हणून गायकांना मिळत नाहीत पैसै -
आदित्यने सांगितलं, की एकच गाणं 20 गायकांकडून गायलं जातं. यानंतर एक कंपनी एक निर्माता आणि एक कलाकार ठरवतो, की यातील कोणाचा आवाज ठेवायचा. मी ही पद्धत इतर कोणत्याही क्षेत्रात पाहिली नाही. कधीही एक सीन शूट करण्यासाठी 20 कलाकार बोलावून त्यातील एकाचाच सीन ठेवला जात नाही. निदान एका गाण्यासाठी आम्हाला एक हजार रुपये तरी द्या, असा टोला आदित्यने बॉलिवूड इंडस्ट्रीला लगावला आहे.