मुंबई - वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या पायल रोहतगीनं नुकतंच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. शिवाजी महाराज हे मुळचे क्षत्रिय नसून ते शुद्र जातीत जन्माला आले होते, असं तिनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. ज्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलच धारेवर धरलं. यानंतर आता पायलनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
मी एका पुस्तकात यासंबंधी वाचलं होतं. केवळ एकाच ठिकाणी याबद्दल वाचून यावर विश्वास ठेवणं चुकीचं असल्यानं हे खरं आहे का? हे जाणून घेण्यासाठी मी ही पोस्ट शेअर केली होती. मात्र याचं उत्तर देण्याऐवजी मला अनेकांच्या शिव्याच ऐकाव्या लागल्या. आपल्या देशात आजही कोणी शुद्र असेल तर त्याच्याकडे चुकीच्या नजरेने पाहिलं जातं, हे खूप वाईट असल्याचं सांगत इंग्रज आणि मुघल गेले मात्र जातीच्या नावाखाली देशाचे तुकडे करून गेल्याचं तिनं म्हटलं आहे.
देशात आजही इतक्या प्रमाणात जातीयवाद आहे आणि मला सध्या सोशल मीडियावर अनेकांच्या टीकांचा सामना करावा लागत आहे. ज्यातील बहुतेक लोक हे मराठीचं असल्याचं पायलनं या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. शिवाजी महाराजांची जात मी सांगितली नव्हती तर मी केवळ एक प्रश्न केला होता. त्यांची जात ठरवायला मी कोण? असा सवाल करत पायलनं याविषयावर स्पष्टीकरण दिलं आहे.