मुंबई - अभिनेत्री पायल घोषने निर्माता अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावताना रिचा चढ्ढासह काही अभिनेत्रींनाही या वादात ओढले होते. त्यानंतर रिचाने पायलच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. आता पायल घोष रिचाची माफी मागायला काही अटींवर तयार झाली आहे.
पायलचे वकिल नितीन सातपुते यांनी न्यायाधीशांना सांगितले, ''गेल्या सुनावणीनंतर रिचा चढ्ढा यांनी काही मीडिया प्रतिनिधींसमोर केस जिंकल्याचे विधान केले होते. यामुळे पायल घोषला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. परंतु तिला ही केस मिटवायला आवडेल.''
सातपुते म्हणाले, ''हे प्रकरण मिटल्यानंतर फिर्यादी (रिचा) यांनी पायलवर कोणताही गुन्हा दाखल करू नये." थोडक्यात रिचाने पुन्हा गुन्हा दाखल करु नये या अटीवर पायल माफी मागण्यास तयार असल्याचे तिच्या वकिलाने सांगितलंय.
अटी निश्चित करण्यासाठी सातपुते हे रिचाच्या वकिलांशी संपर्क करतील. प्रतिष्ठेला कलंक लावल्याबद्दल रिचाने मुंबई उच्च न्यायालयात १ कोटी १० लाख रुपयांचा मानहानीचा दावा केला होता. त्यानंतर पायलने रिचाची माफी मागण्यास तयारी दर्शवली आहे.
रिचा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पायल हिने एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले होते, "हा पूर्णपणे चुकीचा आरोप आहे. प्रकरणात काय करावे लागेल ते मला समजलेले नाही. ती मला बदनाम करण्याचा प्रयत्न का करतेय? त्याऐवजी तिने अनुराग कश्यपला विचारले पाहिजे की त्याने तिचे नाव का घेतले?"
"मी तिला पर्सनली ओळखत नाही. आम्ही कोर्टात जाऊन स्पष्टीकरण देऊ. कश्यपने मला जे सांगितले ते मी फक्त सांगितले आहे. मी नाव घेतलेले नाही," असे या महिन्याच्या सुरुवातीला पायलने सांगितले होते.
मागील महिन्यात पायलने असा दावा केला होता की यापूर्वी अनुराग कश्यपने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कश्यपने अनेक अभिनेत्री केवळ एका कॉलवर त्याच्याकडे येत असल्याचे सांगितल्याचे पायलचे म्हणणे होते. यावेळी कश्यपने रिचा आणि इतर काही अभिनेत्रींची नावे घेतल्याचेही पायलचे म्हणणे होते.
पायलने एकदा ट्विटरवर सांगितले होते की ती कोणाचीही माफी मागणार नाही. आपण चूक केलेली नाही, त्यामुळे कोणाचीही माफी मागण्याचा प्रश्न येत नसल्याचेही ती म्हणाली होती.
आता बदलेल्या परिस्थितीत पायल घोषने माघार घेतल्याचे दिसून येत असून ती रिचा चढ्ढाची माफी मागायला तयार झाली आहे.