साधारण पंधराएक वर्षांपूर्वी ‘बंटी और बबली’ (Bunty aur Babli )हा राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तुफान चालालाही होता. त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होते आणि त्यांनीही चित्रपटात धमाल अभिनय केला होता. या चित्रपटातील गाणीही खूप लोकप्रिय झाली होती किंबहुना ती आताही अनेकांच्या आठवणीत आहेत. यश राज सारखी निर्मितीसंस्था आणि शाद अली यांचे कडक दिग्दर्शन आणि चवीला ऐश्वर्या राय चे ‘कजरारे...’ (Kajrare..song) या गाण्यावरील बेफाम नृत्य या कॉम्बिनेशन मुळे मनोरंजनात वाढीव भर पडली होती. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग आलाय, ‘बंटी और बबली २’ (Bunty aur Babli 2 )ज्यात नवी ‘बंटी और बबली’ ची जोडी पेश करण्यात आली असून ती जुन्या ‘बंटी और बबली’ च्या जोडीला नाचवताना दिसतेय. महत्वाचं म्हणजे हल्ली जुन्या यशस्वी (व्यावसायिकदृष्ट्या) चित्रपटाचे नाव वापरून त्यात नवीन पात्रे भरून जुन्या नावाचा फायदा घेतला जातो तसा ‘बंटी और बबली २’ मध्ये करण्यात आलेलं नाहीये. जुन्या चित्रपटातील पात्रे तीच ठेऊन त्यांचे कथानक पुढे नेण्यात आले असून आधीच्या जोडीसोबत एक नवीन ‘बंटी और बबली’ ची जोडी पेश करण्यात आली आहे. लेखक दिग्दर्शकाने या नवीन जोडीने हा मार्ग का निवडला हे एका भाषणयुक्त संभाषणातून प्रेरित करण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्यात जुन्या ‘बंटी और बबली’ एकत्र येण्यामागची आणि ते कारनामे करण्यामागची निरागसता सापडत नाही. तसंच सध्या तांत्रिकदृष्ट्या भारतासह जग पुढे गेलंय त्यामुळे नव्या ‘बंटी और बबली’ चे कारनामे कृत्रिम वाटू शकतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दोन अभियांत्रिकी पदवीधर, कुणाल सिंग (सिद्धांत चतुर्वेदी) (Siddhanta Chaturvedi) आणि सोनिया रावत (शर्वरी वाघ) (Sharwari Wagh), नोकरीच्या शोधात असतात. परंतु जगातील १८% जनसंख्या असलेल्या आपल्या देशात नोकरी मिळणे ही कठीण गोष्ट आहे हे त्यांना उमगते. खरंतर त्यांनाही इतरांप्रमाणेच एखादा जॉब करून बंदिस्त जीवन जगायला आवडले असते परंतु देशातील बेकारीचा प्रश्न गंभीर असल्यामुळे त्यांना खूप प्रयत्न करूनही नोकरीविना राहावे लागते. तेव्हा त्यांच्या मनात एक विचार येतो आणि ते एक ‘स्कॅम’ करतात ज्यातून त्यांना थोड्या मेहनतीत लाखो रुपये मिळतात. त्यांना ‘बंटी और बबली’ ची स्टोरी माहित असते, त्यामुळे ते ‘बंटी और बबली’ हेच नाव धारण करतात. अर्थातच त्यांना या गोष्टीची चटक लागते आणि ते सरळ ‘गंगा नदी’ विकतात. देशभर हल्लकल्लोळ माजतो आणि सुखाने आणि साधेपणाने जीवन जगणाऱ्या ‘ओरिजिनल’ ‘बंटी और बबली’ ला अटक करण्यात येते. राकेश त्रिपाठी उर्फ बंटी (सैफ अली खान)(Saif Ali Khan) आणि विम्मी म्हणजेच बबली (राणी मुखर्जी) (Rani Mukherjee)घरगृहस्तीमध्ये मश्गुल असतात आणि त्यांनी ‘ते’ धंदे पूर्वीच सोडून दिलेले असतात. पोलीस अधीक्षक जटायू सिंग (पंकज त्रिपाठी) ‘ओरिजिनल’ ‘बंटी और बबली’ ला जबरदस्ती करून व अटक करण्याची धमकी देऊन नव्या ‘बंटी और बबली’ चा शोध लावण्यास सांगतो. त्यानंतर एकमेकांशी लपंडाव आणि पकडापकडी खेळत या ‘बंटी और बबली’ च्या दोन्ही जोड्या प्रेक्षकांचे मनोरंजन करीत धमाल करतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
चित्रपटाची संकल्पना जुनी आहे आणि ती या जमान्यात फिट बसविताना लेखकाची तारांबळ उडाली आहे. तसंच वरुण शर्मा याच्या दिग्दर्शन पदर्पणीय चित्रपटात त्रुटी राहून गेल्याहेत. खरंतर आधीच्या ‘बंटी और बबली’ ची उंची खूप मोठी असल्यामुळे संहितेवर अधिक काम होणे गरजेचे होते. चित्रपटात काही क्षण चांगले जातात परंतु अश्या प्रकारच्या चित्रपटाने प्रेक्षकांना विचार करण्याची उसंत न देता कथानक पुढे पुढे नेणे गरजेचे असते, तसे या संहितेत होताना दिसत नाही. यातील संवाद काही ठिकाणी चमकदार असून अभिनेत्यांनी त्याला न्याय दिलाय. पूर्वार्ध थोडा रेंगाळतो त्यामुळे चित्रपटाच्या लांबीला कात्री लावता आली असती परंतु उत्तरार्ध खचाखच प्रसंगांनी भरलेला आहे आणि अधिक उठावदार झाला आहे. आधीच्या ‘बंटी और बबली’ चे संगीत खास होते परंतु हेच त्याच्या सिक्वेल बाबत म्हणता येणार नाही.
हा चित्रपट अभिनयात बाजी मारतो. आधीच्या ‘बंटी और बबली’ मध्ये ‘ओरिजिनल’ बंटी होता अभिषेक बच्चन परंतु या वेळेस ती भूमिका साकारलीय सैफ अली खान ने. त्याने ‘बंटी’ चांगल्या प्रकारे रंगविला असून त्यात आपले रंग भरले आहेत. सैफ त्याच्या ‘वन-लाइनर्स’ साठी प्रसिद्ध आहे आणि इथेही तो हशे वसूल करतो. राणी मुखर्जीने बबली ताकतीने वठविली आहे. विम्मीचे मोकळे ढाकळे पण तिने ‘लाऊड’ अभिनयातून उत्तम रीतीने साकारले आहे. राणी नक्कीच भाव खाऊन जाते. पंकज त्रिपाठी ने आपली भूमिका नेहमीच्या सफाईने केली आहे. सिद्धांत चतुर्वेदी ‘गली बॉय’ मधील शेर सिंग मुळे प्रकाशझोतात आला होता. इथेही त्याने चमकदार कामगिरी केली आहे. सर्वांत लक्षात राहते ती शर्वरी (वाघ). ती दिसलीय गोड आणि मादक एकाचवेळी. तसेच तिचा स्क्रीन प्रेसेन्झ उत्तम आहे. तिच्या अभिनयात आत्मविश्वास आहे आणि ती बिकिनी मध्ये सुद्धा आपला आब राखते. हिंदी चित्रपटसृष्टीला आवश्यक सर्व गुण तिच्यात असून बॉलिवूडला एक नवीन हिरॉईन मिळाली असे म्हणता येईल.
यश राज पिक्चर्सचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष (Golden Jubilee Year of Yash Raj Pictures)आहे आणि त्यांची पेशकश ‘बंटी और बबली’ प्रेक्षकांचे बऱ्यापैकी मनोरंजन करते तिसऱ्या ‘बंटी और बबली’ ची वर्दी देत.
हेही वाचा - सिद्धांत चतुर्वेदीने सोशल मीडियावरुन केले कारकिर्दीचे सिंहावलोकन