मुंबई - संगीतकार ए आर रहमान यांच्या आई करिमा बेगम यांचे निधन झाले आहे. रहमान यांनी आईचा फोटो पोस्ट करुन सोशल मीडियावर ही माहिती दिली. २८ डिसेंबर रोजी त्यांच्या आईने जगाचा निरोप घेतला. रहमान त्यांच्या आईच्या खूप जवळचे होते आणि प्रत्येक खास क्षणी ते आईची आठवण काढताना दिसले आहेत. अशावेळी आईचे निघून जाणे त्यांच्यासाठी खूप मोठे नुकसान आहे आणि भावनिक आहे.
रहमान यांच्या पोस्टर चाहत्यांनी त्यांच्या आईला श्रध्दांजली वाहिली आहे. करिमा बेगम यांचे मूळ नाव कस्तुरी होते. ते नंतर बदलण्यात आले होते. रहमान यांनीही आपले नाव दिलीप कुमार बदलून ए आर रहमान केले होते. काही दिवसापूर्वी मीडियाशी बोलताना त्यांनी आईबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते, ''संगीतातील माझी प्रतिभा मी नाही तर आईने ओळखली होती.''
''मी नऊ वर्षाचा असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा माझी आई वडिलांचे म्यूझिक इन्स्ट्रूमेंट उधारीवर देऊन घर चालवत असे. ही वाद्ये विकून त्यातून आलेल्या पैशाच्या व्याजातून घर चालवण्याचा सल्ला तिला देण्यात आला होता. मात्र तिने याला नकार दिला. ती म्हणायची की माझा मुलगा आहे तो या वाद्यांची देखभाल करेल.,''असे रहमान म्हणाले होते.
हेही वाचा -ट्विटरवर 'बिग बीं'नी दाखवली त्यांच्या तीन पिढ्यांची झलक
आईबद्दल बोलताना रहमान म्हणाले होते की, ''आईला संगीताचे ज्ञान होते. अध्यात्मिक पातळीवर विचार करताना आणि निर्णय घेताना मला तिची खूप मदत व्हायची. उदाहरणार्थ माझा संगीत शिकण्याचा निर्णय तिने मी अकरावीत असताना घेतला. मी शिक्षण थांबवले आणि संगीतात पुढे गेलो. संगीतच माझे जग आहे याबद्दल तिला विश्वास होता.''