मुंबई - रुपेरी पडद्यावर आपल्या अदांनी अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मीना कुमारींचा आज जन्मदिवस. मीना कुमारींबद्दल असं बोललं जातं, की ज्या चित्रपटात त्या असायच्या त्यांच्यासमोर इतर सर्व कलाकार कमी वाटायचे. इतकंच नाही तर राज कपूरसारखे अभिनेतेही त्यांच्यासमोर आपले डायलॉग विसरून जात. जाणून घ्या, मीना कुमारींच्या जीवनाशी निगडीत अशाच काही खास गोष्टी.
मीना कुमार यांचे वडिल अली बख्श यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची होती. ते थिएटरमध्ये छोटी मोठी काम करत असत. मीना यांना दोन मोठ्या बहिणी होत्या. त्यामुळे तिसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना अनाथ आश्रमाबाहेर ठेवले होते. मात्र, नंतर मीना यांच्या रडण्याचा आवाज ऐकताच ते त्यांना पुन्हा घरी घेऊन गेले.
पैशासाठी वडिल मीना कुमारींना थिएटरमध्ये लहान लहान रोल करण्यासाठी घेऊन जात असत. याचवेळी अभिनेता अशोक कुमार यांनी लहानशा मीना कुमारींना पाहिलं आणि अशोक मीनांच्या वडिलांना म्हणाले, ही लवकरच मोठी होऊन माझ्यासोबत चित्रपटांमध्ये काम करेल. त्यांच्या या वक्तव्यावर तिथे उपस्थित सर्व हसू लागले. मात्र, तेथील कोणालाही या गोष्टीची कल्पना नव्हती, की हे एक दिवस खरंच होणार आहे. पुढे मीना यांनी १९५२ मध्ये आलेल्या तमाशा चित्रपटात भूमिका साकारली, यात त्यांच्यासोबत अशोक कुमार आणि देवानंदही झळकले आणि यानंतर दोघांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केलं.
असं म्हटलं जातं, की मीना कुमारींनी अनेक वर्ष दारूला हातही लावला नव्हता. मात्र, नंतर आयुष्यात एक काळ असा आला की त्यांना या गोष्टीचं व्यसनं लागलं. पुढे हे व्यसन इतकं वाढलं, की मीना कुमारींना आपला जीव गमवावा लागला. पाकिजा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ३ आठवड्यांतच मीना कुमार आजारी पडल्या. २८ मार्च १९७२ ला त्यांना उपचारासाठी सेंट एलिजाबेथच्या नर्सिंग होममध्ये दाखल केलं गेलं. २ दिवसांनंतर त्या कोमात गेल्या आणि ३१ मार्चला वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.